अजितदादांचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे नेणेचा आहे -श्रीमती सुनेत्रावहिनी पवार

बारामती(प्रतिनिधी): येणाऱ्या काळात नागरिक व विकास केंद्रबिंदू मानून अजितदादांचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे नेणेचा असल्याचे प्रतिपादन 201 बारामती विधानसभा मतदार संघ महायुतीच्या उमेदवार श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांनी केले.

श्री क्षेत्र कन्हेरी (ता.बारामती) येथे निवडणूक प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी श्रीमती पवार बोलत होत्या.

यावेळी दिलीपराव वळसेपाटील, आ.अदिती तटकरे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, संजय बनसोडे, आ.सना मलीक, आ.सुनिल शेळके, आ.शंकर मांडेकर, आ.सुनिता आहेरी, जिल्हाध्यक्ष वीरधवल जगदाळे, दिगंबर दुर्गाडे, विवेक वळसेपाटील, कन्हेरीच्या सरपंच सुरेखा शेलार, कल्याण आखाडे, जालिंदर कामठे, सुरेश घुले, सौ.राजलक्ष्मी भोसले, राजेंद्र पोरेकर, निलेश निकम, डॉ.ज्योती मेटे, घनःशाम शेलार, अनुराधा नागवडे, वैशाली नागवडे, सतिश काकडे, आप्पासाहेब जगदाळे, अर्चना पाटील, छत्रपतीचे पृथ्वीराज जाचक, विश्वास देवकाते, विश्वनाथ गावडे, मदन देवकाते, दिलीप खैरे, पांडूरंग कचरे, बाळासाहेब तावरे, ॲड.गोविंद देवकाते, दत्तात्रय येळे, डॉ.राजेंद्र काळे, सुरेंद्र जेवरे, पुरूषोत्तम जगताप, अनिकेत गावडे, दशरथ राऊत, सुनिल शिंदे, संजय वाघमारे, करण खलाटे, शुभांगी शिंदे, पल्लवी खेत्रे, रोहिणी ढोलेकदम, मंगेश जगताप, शिवाजी देवकाते, किरण तावरे, सचिन सातव, सुनिल सातपुते, संदीप बांदल, संभाजी होळकर, संजय कोकरे, विनायक गावडे, रमेश देवकाते, योगेश जगताप, संगीता कोकरे, अविनाश गोफणे, लक्ष्मण गोफणे, नितीन शेंडे, महेश शिंदे, सुभाष सोमाणी, धनवान वदक इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे श्रीमती पवार म्हणाल्या की, दोन महिन्यापूर्वी नियतीचा क्रूर आघात झाला. अजितदादा आपल्यातून गेले. श्रद्धांजली वाहण्यासाठी जनसागर लोटला होता. दादा काय होते हे संपूर्ण महाराष्ट्राला कळाले. आजही दुःख सलते आहे, त्यातून सावरत आहोत. दादांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेणेचा आहे. जनसेवा हीच विचारधारा आहे. दादांकडे जात-पात, धर्म-पंताला थारा नव्हता. त्यांनी प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले. राज्याच्या कठीण काळात देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचेबरोबर राहुन राज्याची आर्थिक घडी बसविण्याचे काम दादांनी केले. लाडकी बहिण योजना राज्यात राबविली. आज आर्थिक शिस्तीमुळे महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. याच प्रेमापोटी प्रचार सभेला महिलांनी उपस्थिती दर्शविली आहे. दादांनी जो मार्ग दाखविला आहे त्याच मार्गाने जाणे हीच श्रद्धांजली ठरेल असेही त्या म्हणाल्या.

दादांचा जो संकल्प होता तो पुढे नेण्यासाठी मी पुढे आली आहे. मतदार म्हणून तुमची जबाबदारी आहे. सर्व बारामतीकर हे दादाच आहेत. तुमचा विश्वास, पाठिंबा, प्रेम व निष्ठा यावर विजय नक्कीच आहे. त्यांच्या अमूल्य विचारावर अनुसरून काम करण्याचा संकल्प केला आहे. एक आई, बहिण, भगिनी म्हणून तुम्ही पाठबळ द्याल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. एक महिला उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडू शकेल का नाही याबाबत तर्कविर्तक चर्चा सुरू होती मात्र असे मूल्यमापन करू नये. या लढ्यात उभे राहण्याचे बळ बारामतीकरांनी दिले. या राज्यातील शोषित, वंचित, पिडीत, शेतकरी, महिला आणि युवक यांच्या कल्याणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, बारामतीच्या जिराईत भागाचा प्रश्न दादांनी मार्गी लावला. जिराईत शब्दच दादांना खोडून काढायचा होता. खडकवासला ते फुरसुंगी या बोगद्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. दादांचा वादा याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द देते. तालुक्यातील 33 गावांचा पाणी टंचाई प्रश्न होता. जनाई शिरसाई योजना राबवून 23 हजार क्षेत्र सिंचनाखाली येऊन या गावांना बळ मिळणार आहे. सीएसआर फंडातून बंदिस्त पाईपलाईन तरडोली, वढाणे, बोरकरवाडी ठिकाणची पाईपलाईन पूर्ण झाली आहे. बारामती पाणीटंचाई दूर करण्यासाठी आपण सर्व मिळून काम करीत राहू. या योजनेचे अपूर्ण राहिलेले काम व दादांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बारामतीत शैक्षणिक, आरोग्य, कृषि, बांधकाम, उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये खूप मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. एमआयडीमध्ये आलेल्या नामांकित कंपन्यांमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. इंदापूर तालुक्यातील जंक्शन याठिकाणी एमआयडीसी झाल्याने बारामतीबरोबर इंदापूर करांना सुद्धा रोजगार उपलब्ध होणार असून, आर्थिक प्रगतीची दालने खुली होणार आहे.

विविध विकास कामे योजना पूर्णत्वास गेलेली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत. दादा प्रेमींनी तालुक्यात जत्रा-यात्रा रद्द केल्या यावरून दादांवर असणारे प्रेम व श्रद्धा दिसून येत आहे. सध्या भारनियमन टाळण्यात आले. जलसंपदा विभागाची संवाद साधून पाण्याचे आवर्तनाची काळजी घेण्यात आली. परीक्षांचा काळ असल्याने सायं.6 ते रात्री 10 या काळात शेतीपंपाचा वापर टाळावा व त्या वीजेची बचत मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करावा असेही ते म्हणाल्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला स्पष्ट आणि काटेकोर योग्य ते आदेश दिलेले आहेत. प्रत्येक नागरिक सुरक्षित राहतील याची काळजी घेऊ. बारामती प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू या असेही त्या म्हणाल्या.

शिव,शाहू,फुले व आंबेडकर यांचे विचार व स्व.यशवंतराव चव्हाण प्रेरणास्थान यांचे सर्वसमावेश प्रगतीच्या विचारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेला मार्ग आजही तितकाच मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.

संयम, शांतता व सामान्य जनतेचे काम करण्याची शिकवण दादांनी दिली त्या मार्गावर जाण्याचा विचार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लोकशाहीचा, मताचा आदर करते, दादांवर ज्याप्रमाणे आपण विश्वास देत आला त्याचप्रमाणे माझ्यावर देताल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामतीकर विकासाच्या बाजुला उभे राहुन नविन इतिहास घडवतील हीच दादांना श्रद्धांजली असेल.

या निवडणूकीत माझ्या विजयासाठी प्रत्येक कार्यकर्ता ज्या प्रमाणिकपणे व निष्ठेने काम करीत आहे त्यांची ऋणी आहे. पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असो प्रत्येकाने या लढ्याला आपली जबाबदारी मानून दिलेली साथ ही अत्यंत मोलाची आहे.

राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. बुथ कमिटीचे व प्रत्यक्ष मैदानात काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेतली जाईल आणि ती मी स्वतः घेईन, त्यांचा सन्मान राखीन. आगामी काळात विकास कामे राबविताना आणि संघटनात्मक काम करताना प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढची दिशा ठरवली जाईल. विविध नियुक्त्या व जबाबदाऱ्या माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल याची खात्री त्यांनी यावेळी दिली.

नव्या दमाच्या, होतकरू आणि सक्षम युवकांना पुढे आणण्यासाठी आम्ही ठोस निर्णय घेऊ त्यांना कामाची संधी उपलब्ध करून देऊ, कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या नाही या भावनेला पूर्णविराम देत प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान आणि पक्षात सहभाग घेतला जाईल. दादांनी पाहिलेले स्वप्न स्वच्छ व सुंदर हरित बारामती पूर्ण करायचे आहे.

या प्रवासात मला व माझ्या सहकार्यांना तुमची साथ, विश्वास आणि आशिर्वाद हेच खरं बळ आहे. मी नेहमीच आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहीन. आपल्या प्रत्येक प्रश्नांना प्राधान्य देऊन त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करेन.

तरी येणाऱ्या 23 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणूकीत घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून बहुसंख्य मतांनी निवडून द्यावे असेही त्यांनी यावेळी आवाहन केले. दादांच्या स्वप्नातील बारामती करण्यासाठी मी पूर्ण ताकतीने काम करेन असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महेश शिंदे (रिपब्लिकन ब्रिगेड)
श्रीमती सुनेत्रा पवार यांना न भूतो न भविष्यतो असे मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्न करणार.

सुनिल शिंदे (आरपीआय आठवले गट)
अजितदादांनी शिव, शाहू, फुले व आंबेडकर विचार रूजविला. विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सर्व शक्तीने सुनेत्रावहिनींच्या पाठीशी उभे राहावे असे पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

दशरथ राऊत (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष)
अजितदादांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीत कोंडी फोडली तेव्हापासून मी दादांकडे आकर्षिले गेलो होतो. कामाची उंची वाढविण्यासाठी 40 वर्ष घालवावी लागतात. माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते. राज्याचे सरकार हलविण्याची शक्ती दादांमध्ये होती. अडीच ते पावणेतीन लाख जास्तीचे मते मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ही काय भावनिक लाट नाही तर दादांचे नेतृत्व व कर्तृत्व मोठे आहे. मी सर्व प्रचार सभेत सहभाग घेऊन सुनेत्रावहिनींची बाजू मांडणार आहे.

भिमशक्ती रिपब्लिकन पक्ष
शिव, शाहु, फुले व आंबेडकरांचे विचार घेत सच्चा योद्धा म्हणून अजितदादांकडे पाहिले जात होते. येणाऱ्या निवडणूकीत विक्रमी मताधिक्याने सुनेत्रावहिनींना निवडून आणायचे आहे.

सुरेंद्र जेवरे (जिल्हाध्यक्ष, शिवसेना)
स्वप्नात वाटले नव्हते पोटनिवडणूक लागेल. याचा विचार न करता पुढे जायचे आहे. बारामतीच्या विकासाची भिस्त सुनेत्रावहिनींवर आहे. त्या दूरदृष्टी घेऊन पुढे जाणार आहेत. दादांनी भविष्याचा विचार करून पुढील 25 वर्षाचा विकास करू ठेवला आहे. महायुतीने विविध योजना राबविल्या. लाडकी बहिण, स्टार्टअप इ. योजना राबविल्या आहेत. दादांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वांनी लवकर बुथवर जावून घड्याळासमोरील बटण दाबून बहुसंख्य मताने वहिनींना निवडून द्यावे असेही ते म्हणाले.

आ.आदिती तटकरे
मनात रूजलेल्या नेत्याला अभिवादन करीत, आम्हा सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांना हा दिवस भावनिक आहे. 24 तारखेला दादांची शेवटची सभा झाली तर 28 तारखेला दुःखद घटना घडली. दादा मारूतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडायचे, आज अशी सभा घेण्याची वेळ येईल असे वाटप नाही. दादा व्यक्ती नाही तर विचार होते. आमच्या कुटुंबातील व्यक्ती होते. त्यांनी अनेक गावे घडवली. विकास कसा घडवावा तर बारामतीसारखा. दादा कधीही स्वतःच्या प्रचारासाठी थांबत नसे तर आमच्यासारख्यांचा प्रचार करीत होते. या निवडणूकीकडे नकारात्मक नाही तर सकारात्मक पणे पहा असेही ते म्हणाल्या.

दादांनी मला संधी दिली, मार्गदर्शन केले दादानंतर काय होईल असा प्रश्न होता. मात्र, वहिनीसाहेबांमुळे त्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला. वहिनीं, दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभ्या आहेत हे विसरून चालणार नाही. दादानंतर वहिनींची विकसित झाल्याची बारामती यापुढे पाहिची आहे. दादांना मुख्यमंत्री झालेले पाहिचे होते. दादांसारखा मुख्यमंत्री लाभला नाही हे दुर्देव आहे. हे स्वप्न वहिनीसाहेब तुम्ही पूर्ण करताल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बहुसंख्य मताधिक्याने निवडून द्या. सर्व पक्ष व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी ऋण व्यक्त केले.

अविनाश मोटे, भाजप
संवेदनशिल वातावरणात सभा होत आहे. आम्ही निवडणूकांच्या सभांना जरी उपस्थित नसलो तरी दादांचे भाषणं आम्ही ऐकत होतो. महाराष्ट्राला दिशा देणारा निर्णयक्षम नेता आपल्यातून निघून गेला ही दुर्देवी बाब आहे. ही पोटनिवडणूक लागेल हेही वाटत नव्हते. दादा राज्यात सक्षम निर्णय वहिनींच्या पाठींब्यामुळे घेत होते. विविध मान्यवर प्रचारासाठी येणार आहेत. यापुढे मतदार संघाची रचना बदलणार आहे. सुनेत्रावहिनी निवडून येणारच आहेत पण त्यांना रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून आणायचे आहे.

आ.ज्योती मेटे
दादांनी विकासाचे स्वप्न बारामतीत प्रत्यक्षात उतरविले. बारामतीसारखा विकास बीडचा होईल असे वाटत होते. आज या पुरोगामी महाराष्ट्राने महिला उपमुख्यमंत्री पाहिले आहे. सुनेत्रावहिनी निवडून येणार आहेतच नियतीने संधी दिली आहे ती जबाबदारी तुमच्यावर आहे. शिवसंग्रामचा पाठिंबा आहे. वहिनीसाहेबांनी विधेयकाची अंमलबजावणी होण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे याचा अभिमान वाटतो.

कृषिमंत्री ना.दत्तात्रय भरणे
काम करणारा, शब्दाला जागणारा व अंगावर घेणारा नेता आम्ही गमावला आहे. येणाऱ्या 23 तारखेला घड्याळासमोरील बटण दाबून बहुसंख्य मताधिक्याने निवडून द्या. दादांनी लाडक्या बहिण, शेतकरी, बचतगट इ. योजना आणल्या. दादांनी राज्यासाठी केले पण बारामतीकरांसाठी काय नाही केले याचा विचार करण्याची गरज आहे. काळजी घेणारा नेता राहिला नाही.

सुनेत्रावहिनींनी आमदारांच्या विनंतीला मान देऊन पदे घेतली व राज्याच्या नागरिकांसाठी जबाबदारी घेतली. वहिनींकडून अपेक्षा वाढल्या आहेत. दादांचा वारसा यांच्यामध्ये दिसत आहे. प्रत्येकाने गट-तटाचा विचार न करता आपआपले गाव, वाडी, वस्ती व प्रभाग सांभाळायचा आहे. सुनेत्रावहिनी व दादांचे आपण काही तरी देणं लागतो हा विचार करून मतदान करा. महत्वाची निवडून आहे गहाळ राहून चालणार नाही. कार्यकर्त्यांनी पवार कुटुंबाचे प्रेम आपल्यावर कमी आहे असे समजू नका. निवडणूकीत कोणाला जबाबदारी दिली हे पाहू नका. मतदान एकामुळे नाही तर तुमच्या सर्वांमुळे होणार आहे. दादांवर असणारे प्रेम दाखवा. पवार कुटुंब कोण कानाचा व कोण कामाचा हे चांगले जाणतात. शेतकरी, कामगार व लाडक्या बहिणींसाठी योजना करणारा नेता आज आपल्यातून गेला आहे.

विश्वास देवकाते (मा.अध्यक्ष, जि.प.पुणे)
दादा आगळे-वेगळे नेतृत्व होते. बारामतीसारखा राज्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. दुःखावर विर्जन टाकून सुनेत्रावहिनी बाहेर पडल्या आहेत. सध्या त्या चांगल्या पद्धतीने कामे हाताळत आहेत. दादांच्या रूपात सुनेत्रावहिनींना पहा, बाहेरचे मतदान जातीने करून घ्या. आज कामाचा माणूस, महापुरूष आपल्यातून हरपला आहे. दादांचे स्वप्न वहिनीसाहेब पार पाडतील यात शंका नाही.

आ.सुनिल शेळके, मावळ
दादांचे योगदानामुळे आडगळीत पडलेल्याला संधी दिली. त्यामुळे मी आज तुमच्या समोर आहे. माझी त्यांच्यावर अफाट श्रद्धा आहे. जेजुरी सोडली मनोमन वाटत होते. कुठून तरी फोन येईल पाटनिवडणूक रद्द झाली, दादा आले. मात्र, नियतीने कसा घाला घातला याचा विचारही करू शकत नाही.

मावळच्या लोकांना विकास काय असतो हे माझ्यातून दादांनी दाखवून दिले. दादा गेल्यानंतर अंधार निर्माण झाला होता. तो अंधार उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष पदे घेऊन दूर करण्याचे काम वहिनींनी केले. दादांच्या फोटो व अस्मीतेवर जिल्हा परिषद व पंचायत समिती जिंकल्या एवढं कर्तृत्व दादांचे होते. बारामतीकर पोरके झाले नाही तर संपूर्ण पुणे जिल्हा पोरका झाला आहे. पं.स.,जि.प. मतदानाचा टक्का कमी झाला होता तो यावेळी दुरूस्त करायचा आहे. 90 टक्के मतदान झाले पाहिजे. दादांनी प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन काम केले. जातीपातीच्या भिंतीत बांधायचा प्रयत्न करू नका. पक्षाची ताकद वाढवायची असेल तर ही संधी आहे. वहिनीसाहेब दादांचे कर्तृत्व एवढं कमी नाही की तुम्ही प्रचाराला फिरावे. कार्यकर्ते दादांचे अनुयायी आहेत हे विसरून चालणार नाही.

आ.सना मलिक, मुंबई
दादांनी आमच्यासाठी व समाजासाठी काय केले हे सांगता येणार नाही. 2023 पासून दादांबरोबर काम केले. दुर्देवी घटना ऐकल्यावर दोन दिवस निशब्द झाले. 30 तारखेला वहिनींचे नाव ऐकले दुःखातून मन सावरले. उपमुख्यमंत्री वहिनी झाल्या म्हणून त्यांना भेटले नाही तर एक महिला म्हणून मी त्यांना भेटले. पतीला गमावल्याचे दुःख काय असते ही एक महिलाच जाणते. 31 जानेवारीपासून दुःखावर विर्जन टाकून त्यांनी काम सुरू केले. तुमचे आमचे दुःख आजही आहे परिवाराचे दुःख काय असेल याचा विचार करता येणार नाही. मी प्रचारासाठी नाही आले तर बारामतीकर एक परिवार आहात तुमची जबाबदारी असल्याचे सांगायला आले आहे.

दादांच्या पश्चात वहिनी, पार्थ व जय ही तीन लोकं सोडून गेलेली आहेत. दादांना दाखवून आम्ही मते मिळवली आहेत. या निवडणूकीत आम्ही मते मागत नाही तर तुमची जबाबदारी दाखवून देण्यासाठी आली आहे असेही ते म्हणाले. आज दादा जरी गेले तरी त्यांचे स्वप्न संपले नाही. त्याच गतीने काम सुरू राहील याचा विश्वास नव्याने तयार केलेल्या एकच वादा…वहिनी आणि दादा यावरून दिसत आहे.

आ.दिलीप वळसेपाटील
1981 साली पवार साहेबांचा स्वीय सहाय्य म्हणून काम केले. ही निवडणूक नियतीने लादलेली आहे. सर्वांनी या निवडणूकीला 23 तारखेला सामोरे जावून बहुसंख्येने सुनेत्रावहिनींना निवडून द्यायचे आहे. शब्द रूपाने भावना व्यक्त करता येतात पण दुःख वाटून घेता येत नाही. दादांनी सतत सामाजिक न्यायाची भूमिका ठेवली. बारामती व देशाला दिलेली देन म्हणजे विद्या प्रतिष्ठान होय. पवार कुटुंबियांनी खूप मोठे काम केले आहे. दादा, जयंत पाटील, आर.आर.आबा व मी 1990 साली आमदार झालो. दादा लोकसभेचे सदस्य झाले तर साहेब मुख्यमंत्री झाले होते.

पवार कुटुंब राजकीय नसून सर्व समावेशक सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. दादांचे विकास कामाचे स्पीड वेगळेच होते. दादांमुळे दुष्काळी बारामती बागायती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात गणला जातो. देशाचे अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांनी विकासाचे मॉडेल बारामती आहे असे सांगितले होते.

सुनेत्रावहिनी राजकारणात नवख्या नाहीत हे जाणले पाहिजे. माहेरला राजकीय परंपरा आहे. त्यामुळे त्या कुठेच कमी पडणार नाही. मतदार संघाची पुर्नरचना होणार आहे. लोकसभा, विधानसभा 1/3 जागा महिलांसाठी राखीव होणार आहेत. येणाऱ्या काळात पक्षाची ताकद वाढविण्याची गरज आहे. ओळख सुद्धा सांगता येणार नाही असे उमेदवार रिंगणात आहे. दादा वहिनींसाठी काम करायचे आहे. कृतज्ञता व्यक्त करायचे असेल तर निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागेल. कोणीच गहाळ पडायचे नाही. अन्यथा मतदानाची टक्केवारी कमी होईल. स्पर्धा समोरच्या उमेदवाराशी नाही तर आपल्याशी स्पर्धा आहे हे लक्षात ठेवा. दादा प्रचाराचा नारळ व शेवटची सभा घेऊन बहुसंख्य मताने निवडून येत होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!