बारामती(वार्ताहर): ज्या बारामती सहकारी बँकेची मुहूर्तमेढ करणार्या कै.मानसिकराव तुपे यांचे ज्येष्ठ चिरंजीव बँकेचे चेअरमन पोपटराव तुपे (वय-75) यांचे अल्पश: आजारामुळे दि.30 सप्टेबर 2020 रोजी दु:खद निधन झाले.
बारामती सहकारी बँकेच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. बारामती नगरपरिषदेवर नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती, दि बारामती मर्चंट असोसिएशन, माळेगाव कारखाना इ. ठिकाणी आपल्या कामातून ठसा उमटविला. गेली 23 वर्ष बारामती सहकारी बँकेचे अध्यक्षपद सांभाळणारे तुपे होते.
बारामतीत मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरे करण्याची परंपरा यांच्यापासून सुरू झाली. भाऊंचा वाढदिवस म्हणजे बारामती, दौंड व इंदापूर येथील नागरीक भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे घर गाठत होते. शहराच्या प्रत्येक चौकात भाऊंचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असे.
बारामती मर्चंट असोसिएशन किंवा व्यापारी महासंघ यांच्या माध्यमातून व्यापार्यांचे प्रश्र्न सोडविण्यासाठी ते सतत पुढे असत. त्यांनी कित्येक युवकांना बँकेच्या माध्यमातून नोकरी लावली व असंख्य सभासद सुद्धा जोडले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण बारामती व आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे.