बारामती(प्रतिनिधी)ः समाजात आजही काही लोक जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचा आदर्श ठेवतात, त्यापैकी मुनीर तांबोळी यांचे नाव अभिमानाने घ्यावे लागेल. त्यांच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीला वेळेवर मदत मिळाली आणि संभाव्य संकट टळले. हे ऐकून मुनीर तांबोळीबद्दल अभिमान तर वाटतो पण त्यांनी असलेली जबाबदारी आणि मानवी मूल्यांची जाणीव करून दिलेल्या कार्यामुळे जवळच्या लोकांची छाती 56 इंचाने वाढल्याशिवाय राहणार नाही.
मुनीर तांबोळी हे सामाजिक क्षेत्रात दोन पाऊल पुढे होऊन काम करीत असतात. सामाजिक प्रबोधन करण्यामध्ये सुद्धा ते पुढे आहेत. एक बौद्धीक चळवळ त्यांनी रूजविण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते करीत असलेल्या प्रबोधनाने बारामती शहर व तालुक्यात तरी धर्मनिरपेक्ष विचार आणला आणि स्वातंत्र्य, समानता आणि वैयक्तिक हक्क यासारख्या समस्या लोकांना समजून घेण्याच्या मार्गांना आकार दिला.
सविस्तर हकीकत सांगताना मुनीर तांबोळी म्हणाले की, मी कसबा येथील राष्ट्रवादी भवनासमोर दुचाकी वाहन बाजुला थांबवून फोनवर बोलत होतो. तितक्यात पाठमोऱ्या बाजूने कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि एक अल्पवयीन मुलगी घाबरलेल्या व बिथरलेल्या अवस्थेत म्हणाली, काका मला वाचवा किंवा माझ्या घरी सोडा… हे ऐकून मी गोंधळात पडलो. अल्पवयीन मुलगी अशा अवस्थेत मदत मागत आहे. अशात मी प्रसंग ओळखून तिला विचारले, ताई तुला काय झाले, तू कोठून आली, तूझे नाव काय, तू कुठे राहती. एवढे प्रश्न विचारताच तिने तातडीने नाव, पत्ता सांगितला. कुटुंबातील कोणाचा तरी नंबर देण्याची मागणी केली असता, तिने सांगितले वडील वारले आहेत, मी आणि आई दोघेच कुटुंबात आहोत. आई शोरूममध्ये तर मी कसब्यातील पाच दिवसांपूर्वीच ड्रायक्लिनींगच्या दुकानात कामास लागले आहे.
तद्नंतर मी तीस विचारले तू पळत का आहेस. तिने सांगितले मी आणि माझी मैत्रीण जुन्या कचेरी जवळील छोट्या पुलापाशी वॉशरूमसाठी खाली नदीपात्रात गेलो होतो. तिथे माझा मानलेला काका आला आणि त्याने मला मारले माझी मैत्रीण भीतीने दुसरीकडे पळून गेली मी नदीपात्राने पळत असताना माझ्या मागे नदीपात्रातील काही तरूण लागले मी स्मशानभूमीच्या तिथून नदीपात्रातूनवर चढत,धावत, पळत ढवाणपाटील चौकातून इथपर्यंत आले. तीस तिच्या आईचा नंबर आठवत नव्हता, आईचा बीपी लो होतो असेही ती म्हणाले.
मुनीर तांबोळी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता मुलीने सांगितलेल्या हकीकत ऐकून तांबोळी यांच्या मनात विविध गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले. मुनीर तांबोळी यांनी तिला शांत राहण्यास सांगून, पाणी पिण्यास दिले आणि तिस धीर दिला. सामाजिक क्षेत्रात काम करीत असल्याने तांबोळी यांनी शहर पोलीस स्टेशनला फोन लावला तांत्रिक अडचणीमुळे तो उचलला गेला नाही. तद्नंतर पो.निरीक्षक विलास नाळे यांना फोन लावला ते मिटींगमध्ये असल्याने फोन रिसीव्ह केला नाही. सदरची परिस्थिती पाहता मुनीर तांबोळी यांनी दक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांना संपर्क केला. त्यांनी दहा मिनीटात पोहचतो असे सांगताच, तितक्यात बारामती शहरचे पो.नि.विलास नाळे यांचा फोन आला त्यांना सदरची घटनेचा वृत्तांत दिला असता, त्यांनी पोलीस वाहन पाठवून त्या मुलीस घेऊन गेले. डॉ.सुदर्शन राठोड यांनी मुलीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु मुलगी घाबरलेल्या अवस्थेत होती त्यामुळे तीने काहीच प्रतिउत्तर दिले नाही.
वरिष्ठ व कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्परता दाखवली त्याबद्दल मुनीर तांबोळी यांनी पोलीसांबाबत अभिमान व कौतुक व्यक्त करीत उपस्थित तरूण व नागरिकांचे आभार मानले व एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. डॉ.राठोड यांनी मुलीला तिच्या कुटुंबापर्यंत सुरक्षित पोहोचवून न्याय देण्याची ग्वाही दिली.
या घडलेल्या घटनेतून मुनीर तांबोळी यांनी नागरिकांना संदेश देताना सांगितले की, वाढते शहरीकरण, सोशल मीडियाचा अतिवापर तसेच जीवन जगण्याच्या स्पर्धेत आई-वडिलांचे कष्ट विशेषतः मुलांच्या तारुण्यात होणाऱ्या फेरबदलाकडे- ऍक्टिव्हिटीकडे लक्ष देण्यात पालक कमी पडतात आणि अशी एखादी घटनेला सामोरे जावे लागते. समाजातील सजग व जागरूक नागरिक जीवाच्या भितीने सुद्धा अशा घटनेत पुढे येण्यास तयार नसतात.
पोलीसांवर विश्वास ठेवत प्रकरण हाताळले तर कोणतीही भिती मनात बाळगता कामा नये. साहजिकच सर्वसामान्य नागरिकांना भीती वाटतेच हे नाकारून चालणार नाही. परंतु, आपण राहता त्याठिकाणी निर्भया बलात्कारासारखी घटना घडू नये म्हणून पोलीसांची मदत घेऊन अशा प्रकारणांना वाचा फोडू शकतो. आपण सजग जागरूक नागरिक म्हणून पोलिसांची मदत घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून एखाद्याला आपण मदत पोहोचू शकतो.