पोलीसांचा अजब कारभार…

एखाद्या व्यक्तीचे पैसे समोरचा व्यक्ती देत नसेल तर, त्याची वसुली पोलीसांना करण्याचा अधिकार नाही. किंवा पैसे देत नसलेल्या व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उचलून आणणे, पोलीसी खाक्या दाखविणे, बळजबरी करणे, धमकावणे असे कृत्य पोलीसांना करता येत नाही. कित्येक वेळा अशा प्रकरणात पोलीस समोरच्या व्यक्तीला तुम्ही मे.कोर्टात जो पैसे देत नाही त्याच्या विरोधात खटला दाखल करा असे सांगून टाकतात मात्र, चक्क पोलीसांनी यामध्ये जातीने लक्ष घालून दमदाटी करून, पोलीस स्टेशनला घेऊन जावून बळजबरीने वसुली केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सचिन देशमुख नावाच्या इसमाने माळशिरस पोलिस स्टेशनला अक्षय ढवळे यांच्या विरोधात गु.र.नं. 432/25 अन्वये बी.एन.एस.316(2) व 318(4) अन्वये गुन्हा दाखल केला होता. अक्षय ढवळे हा व्यक्ती ऑगस्ट महिन्यामध्येच मयत झाला. 20 सप्टेंबर 2025 रोजी माळशिरस पो.स्टेशनचे पोलीस महेश थोरात, एक महिला पोलीस कर्मचारी, सचिन देशमुख व उरुळी कांचन पोलीस स्टेशन मध्ाील पोलीस कर्मचारी इ. मयत अक्षय ढवळे यांच्या पत्नी श्रीमती मोना ढवळे यांच्या घरी गेले. श्रीमती ढवळे यांना घेऊन उरुळी कांचन पोलीस स्टेशनला आले. फिर्यादी सचिन देशमुख यांचे पैसे दे आणि मॅटर मिटव अशी दमदाटी करण्यास सुरूवात केली. जे काय व्यवहाराचे पैसे आहेत ते चेक द्वारे दे असे पोलिसांनी सांगितले.

तद्नंतर पोलीस महेश थोरात, महिला पोलीस कर्मचारी, सचिन देशमुख हे श्रीमती ढवळे यांच्यासोबत घरी गेले. दमदाटी व धमकीच्या दबावाला बळी पडून भितीने श्रीमती ढवळे यांनी घरातील कागदपत्रे घेतली व कोटक बँक उरूळी कांचन याठिकाणी गेले. तेथे गेल्यानंतर श्रीमती ढवळे यांच्याबरोबर बळजबरी करून सचिन देशमुख यांच्या नावे पाच लाख रुपये आरटीजीएस करण्यास भाग पाडले. हा सर्व प्रकार पाहता भरलेला चेक यावेळी श्रीमती ढवळे यांनी फाडून टाकला.

वरील पोलीस महेश थोरात, महिला पोलीस व सचिन देशमुख व त्यांच्या इतर साथीदारांनी श्रीमती ढवळे यांना गाडीत बसविले, गाडीत मारहाण करीत पैसे देणेबाबत तगादा लावला. बारामती येथील कोटक बँकेमध्ये आणले. वरील सर्व लोक सावलीसारखे श्रीमती ढवळे यांच्या मागे उभे होते. बळजबरीने सचिन देशमुख यांच्या खात्यावर पाच लाख आरटीजीएस करून घेतले.

आरटीजीएस झालेनंतर श्रीमती ढवळे यांना माळशिरस पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलिसांनी श्रीमती ढवळे यांच्याकडून दोन कोरे चेकवर व दोन कोऱ्या कागदावर सह्या करून घेतले. या सर्व प्रकारातून पोलीसांना अशा प्रकरणात लक्ष देता येते का? किंवा एखाद्या आरोपीला ताब्यात घेऊन स्वतः बँकेत जावून फिर्यादीचे नावे असणारे पैसे वर्ग करता येतात का? हे सर्व पाहिले असता कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचे दिसून येत आहे.

पोलीस विधवा महिलेला बळजबरीने धमकावून, मारहाण करून, वेठीस धरून तिच्याकडून फिर्यादीला पाच लाख द्यायला भाग पाडीत असतील तर हा एक प्रकारचा दरोडाच म्हटले तर वावगे ठरू नये.

सदरचा झालेला असह्य प्रकाराबाबत श्रीमती ढवळे या बारामती शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेल्या असता, पोलिसांनी अर्ज देखील स्वीकारला नाही. श्रीमती ढवळे पोलिसांना विनंती करीत होत्या माझे पैसे बारामती बँकेमधून गेले आहेत, तुम्ही अर्ज घ्या. परंतु पोलिसांनी अर्ज घेतला नाही.

सदरचा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने श्रीमती ढवळे यांनी माळशिरस पोलीस, बारामती शहर पोलीस, फिर्यादी सचिन देशमुख व इतर लोकांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याबल याचिका दाखल केली आहे.

बारामती शहरचे पोलीस अर्ज घेण्यास टाळाटाळ करतात व कोणाला जरी अर्ज केल्यास जे आर्थिक देण्या घेण्याचा विषय असतो, बनावटीकरणाविषयीचा विषय असतो त्यात पोलीस कोणती शहानिशा न करता अर्ज निकाली काढतात किंवा अर्ज घेत नाहीत तसेच माहिती अध्ािकारातील अर्ज पोलीस घेण्यास नाकारतात, टाळाटाळ करतात वास्तविक पाहता पोलिसांनी प्रत्येक आलेला अर्ज घेतलाच पाहिजे. या प्रकरणात पोलीसांना नक्कीच किंमत मोजावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!