बारामतीः महाराष्ट्र शासनाने राज्य व जिल्हास्तरावर 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करणेबाबत मागास बहुजन कल्याण विभागाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक न्याय, आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा असल्याचेही म्हटले आहे. त्या अनुषंगाने रविवार दि.31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 वा. भिगवण चौक नगरपालिकेसमोर बारामती याठिकाणी भारतीय टकारी समाज संघ शाखा बारामतीच्या वतीने विमुक्त दिन व शासनाचा आभार सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बारामतीचे तहसिलदार गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय टकारी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.अविनाश गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 31 ऑगस्ट रोजी सार्वजनिक, साप्ताहिक किंवा स्थानिक सुट्टी असली तरीही ‘भटके विमुक्त दिवस’ याच दिवशी साजरा करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी, आधारकार्ड नोंदणी, जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक दस्तऐवजांची माहिती देणाऱ्या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील व जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात व अंमलबजावणीची कार्यवाही सुनिश्चित करावी असेही म्हटले आहे.
पुर्वा श्रमिच्या गुन्हेगार जमाती म्हणजेच 14 विमुक्त जमाती होत्या. यामध्ये बेरड, बंजारा, भामटा, बेस्टर, कंजारभाट, कैकाडी, कटाबू, रामोशी, पालपारधी, राजपारधी, रजपूत भामटा, वडार, वाघरी, छप्परबंद यांचा समावेश होता.
ब्रिटीश सरकारने 1871 च्या गुन्हेगारी जाती जमाती प्रतिबंध कायदाने जन्मजात गुन्हेगार जमाती म्हणून घोषित करून तारेच्या कुपनात (सेटलमेंट) बंधिस्त केले होते. भारत देश स्वतंत्र झाला तरी हा कायदा अस्तित्वात होता पण 31 ऑगेस्ट 1952 साली भारत सरकाने हा कायदा रद्द करून या जमातींना विशेष मुक्त केले. तेंव्हापासून या जमाती 31 ऑगस्ट हा विमुक्त दिन म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात.
महाराष्ट्र शासनाने नुकताच 31 जुलै 2025 रोजीचे शासन निर्णय नुसार स्वातंत्र चळवळीतील व राष्ट्र उभारणीतील विमुक्त जमातीच्या योगदानाचा आदर करून 31 ऑगस्ट हा दिवस “भटकेविमुक्त दिवस“ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्यानंतर 78 वर्षानी का होईना शासनाने या जमातीचे योगदानाची दखल घेतली आहे. त्यामुळे शासनाचे आभार मानने हे आपले कर्तव्य समजतो बारामती मध्ये भामटा सेटलमेंट येथे भामटा म्हणजेच टकारी समाजाचे वतीने दरवर्षी 31 ऑगस्ट 2025 हा विमुक्त दिन सोहळा साजरा केला जातो त्या निमित्त विमुक्त दिन व शासनाचे आभार सोहळा यावर्षी आयोजित केला असल्याचे भारतीय टकारी समाज संघ शाखा बारामतीचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.