भिगवण(प्रतिनिधी-योगेश गायकवाड): ट्रॉमा केअर सेंटर व ग्रामीण रूग्णालय भिगवण (ता.इंदापूर) यांच्या संयुक्त विद्यमानाने कॅन्सर तपासणी अभियान राबविण्यात आले. 233 लाभार्थ्यांनी या कॅन्सर तपासणी शिबीराचा लाभ घेतला.
या शिबीरास इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पोळ मॅडम यांनी शिबिराला भेट देत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी भिगवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन विभुते, डॉ.अनिकेत लोखंडे, स्त्रीरोगतज्ञ डॉ.अमोल खानावरे, डॉ.दिवेकर, दंतरोगतज्ञ डॉ.घोगरे, शेटफळगढे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील, डॉ.कारंडे, आरोग्य सहाय्यक श्री.सोनवलकर इ. उपस्थित होते.
या शिबीरात भिगवण, तक्रारवाडी व इतर आसपासच्या गावातील सर्व महिला बचत गट, आशा सेविका यांनी सर्वेक्षणांद्वारे तपासणी केलेल्या संशयित कॅन्सर रुग्णाची सखोल चौकशी केली. असंसर्गजन्य रोग कार्यक्रम अंतर्गत कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन मार्फत कर्करोग रुग्णांची तपासणी करण्यात आली.
सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शेटफळगढे येथील सर्व आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व सर्व गट प्रवर्तक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, रुग्णवाहिकाचे वाहन चालक,आशा स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर शिबिराच्या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन राबविलेल्या शिबीराचे कौतुक केले.