इंदापुर (प्रतिनिधी-अशोक घोडके) भिडेवाडाकार फुलेप्रेमी विजय वडवेराव आयोजित देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतर राष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत जिल्हास्तरीय बारामती भिडेवाडा कविसंमेलन बारामती येथील मोनिका लॉन्स, जळोची रोड, एम आय डीसी बारामती येथे नुकतेच भव्य दिव्य स्वरूपात पार पडले.
संमेलनाच्या अध्यस्थानी सभागृहात उपस्थित शेकडो फुलेप्रेमी कवी कवयित्री व रसिक होते. या अभियानाचे सर्वेसर्वा भिडेवाडाकार विजय वडवेराव यांनी प्रास्ताविक केले.
जर रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा जोतीराव फुले यांनी शोधून काढली. या देशात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महात्मा फुले यांनी साजरी केली म्हणजे शिवजयंतीची सुरुवातच फुलेंनी केली असेल तर आज पर्यंत देशात साजऱ्या झालेल्या कोणत्याही शिवजयंतीत महात्मा फुले यांची साधी प्रतिमाही का ठेवली गेली नाही?
जर आपल्याला आपल्या महा पुरुषांचा इतिहास जिवंत ठेवायचा असेल, जतन करायचा असेल तर १९ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या शिवजयंतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसोबत महात्मा फुलेंचीही प्रतिमा ठेवावी व त्या प्रतिमेचे पूजन करावे. हा इतिहास शाळा शाळातून विद्यार्थ्यांना शिकवला जावा, जन माणसात याबद्दल जागृती व प्रबोधन केले जावे असे आवाहन भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांनी उपस्थितांना केले.
देशातील मुलींची पहिली शाळा भिडे वाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जिल्हास्तरीय भिडेवाडा कविसंमेलनाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. देशातील मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास जतन करणे, क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाला पुन्हा नव्याने उजाळा देऊन फुले दांपत्याचा गुणगौरव करणे हाच या अभियानाचा उद्देश आहे असे वडवेराव म्हणाले या कविसंमेलनात शंभरपेक्षा जास्त फुलेप्रेमी कवी कवयित्रिंनी देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा या एकाच विषयावर अतिशय प्रबोधनात्मक व जनजागृती करणाऱ्या कविता सादर केल्या. सर्व कवींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व फुलेप्रेमी अशी अक्षरे लिहिलेला पेन देऊन सन्मानित करण्यात आले.
बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदूळवाडीच्या शिक्षिका कवयित्री वनिता जाधव, त्यांचे कुटुंबीय, अभियानाच्या बारामती कार्यकारिणीने या संमेलनाचे यशस्वी आयोजन केले. हे कविसंमेन सर्वांसाठी विनामूल्य तर होतेच पण चहा, नाष्टा, उत्कृष्ट जेवण सुविधा मोफत पुरविण्यात आलेल्या होत्या. या प्रसंगी पुरंदर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कवी संजय जाधव आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते