शारदानगर(प्रतिनिधी): या देशात पैगंबर पेरला तर तुकाराम उगवतो. मी वास्तववादी कविता लिहितो. मी फक्त आणि फक्त माणसावर प्रेम करणारा कवी असल्याचे परखड मत दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी व्यक्त केले.
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ, रोशीनी ॲक्शन फॉर इम्पॅक्ट फाउंडेशन, नागरिक विकास अध्ययन संस्थान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 27 ते 30 जानेवारी या कालावधीत शारदानगर येथे स्वयंसिद्धा युवती संमेलन संपन्न झाले. याप्रसंगी श्री.चंदनशिवे आपल्या कवितेतून व्यक्त होत होते.
तिसऱ्या दिवशी डॉ. चारुलता बापये, यांनी स्त्री आरोग्य’, मा. नितीन चंदनशिवे, यांनी जगणं कवितेचं,; टेड टॉक स्पीकर, मा.अभिषेक ढवान यांनी हेल्थ हार्मोन मूड स्विंग आणि ब्रेन’, भिकाऱ्यांचे डॉक्टर’ मा. डॉ. अभिजीत सोनवणे यांनी भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी’ या विषयांच्या अनुषंगाने युवतींशी संवाद साधला.
चंदनशिवे पुढे म्हणाले की, प्रत्येक मुलींमध्ये मला माझी बहीण दिसते. मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. त्याशिवाय लग्नच नाही करायचा असा निश्चय करा. लग्नानंतरच माझ्या कवितेचा प्रवास सुरू झाला. कवितेने मला जगवलं आणि जगायला शिकवलं. मी जे जीवन जगत होतो ते आपोआप माझ्या कवितेत उतरत होते, माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा पत्नी तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी तयार करते आणि तीच यादी माझी कविता असते. आयुष्यभर नाही पण महिनाभर ती मला पुरते. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून पहिला डोळा आहे. कविता ही खरेपणातून येते. खरे बोलण्यामुळेच मला कवितेची आवड निर्माण झाली.
डॉ.चारुलता बापये म्हणाल्या,“ तरुणपणात सकस आहार घ्या, आहारामध्ये कडधान्य पालेभाज्या व फळ असावीत. ब्रेस्ट कॅन्सर ही खूप गंभीर समस्या आहे, वयाच्या चाळीसी नंतर महिलांनी बेस्ट कॅन्सरची तपासणी केली पाहिजे. गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाणही वाढत आहे. त्यावर लस आहे, नऊ ते पंधरा वर्षातील मुलींनी ही लस घेतली पाहिजे. हिमोग्लोबिनची तपासणी केली पाहिजे. मासिक पाळीच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या, कॉटनचे सॅनिटरी पॅड वापरा. विवाहपूर्व लैंगिक संबंध टाळा. नियमित व्यायाम करा, व्यसनांपासून दूर राहा, शारीरिक सुंदरतेपेक्षा, मनाची सुंदरता महत्त्वाची आहे. मुलींवर-महिलांवर खूप मोठ्या प्रमाणात लैंगिक अत्याचार वाढलेले आहेत. योग्य वयात लग्न करा, लग्न करण्याआधी दोघांचेही रक्तगट तपासा. लग्नानंतर आपल्या पतीशी व कुटुंबामध्ये सुसंवाद ठेवा, मुला-मुलींमध्ये कधीही भेदभाव करू नका.”
अभिषेक ढवाण म्हणाले, “जेवढे जास्त चालाल तेवढा मेंदू जास्त काम करतो. मेंदूच्या विकासासाठी चालणे- व्यायाम करणं व झोप फार महत्त्वाचे आहे. मेंदू रोज वाढतो व कमी होतो, मुलींच्या मासिक पाळीमुळे त्यांचा मेंदू शांत राहतो. पुरेशी झोप झाली नाही तर अधिक काळ लक्षात राहत नाही त्यामुळे पुरेशी झोप घ्या. शरीरयष्टी चांगले असते तीच मुले, मुलींना आवडतात. मुले-मुली वयात येताना त्यांच्यामध्ये अनेक शारीरिक बदल होतात. स्त्रियांनी घट्ट पॅन्ट घालू नयेत कारण त्यामुळे स्त्रियांच्या गर्भाशयावर परिणाम होतो, तसेच जास्त घट्ट ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढते, असे संशोधनातून आढळून आले आहे.;
डॉ.अभिजीत सोनवणे यांनी अनुभव कथन केले. ते मूळचे म्हसवडचे 1999 मध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाले, वैद्यकीय प्रॅक्टिस करताना अपयश आले. आत्महत्या करण्याचा विचार आला, अशावेळी अंगळबे गावातील भिक्षेकरी दांपत्याने त्यांना आधार दिला, पुढे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी सहा आकडी पगाराची नोकरी सोडली, भिकाऱ्यांसाठी काम करायचे ठरवले. ते म्हणाले, मी पहाटे लवकर उठतो, आपल्या दुचाकीवर गोळ्या- औषध घेऊन मंदिरे, उद्यान, रस्ते व चौक या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी उभे असलेल्या भिकाऱ्यांशी संवाद साधतो, त्यांना मानसिक आधार देतो, त्यांची तपासणी करून औषध देतो, आणि मग त्यांना भीक मागण्याच्या सवयीपासून परावृत्त करतो, त्यांना छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देतो, आर्थिक मदत करतो. आज अनेक भिकारी भीक मागायचं सोडून मंदिरात फुले- नारळ विकतात, भाजी विकतात. अनेक भिकाऱ्यांनी भीक मागायला सोडून स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहे. भिकाऱ्यांना भीक देण्यापेक्षा स्वावलंबी होण्यास मदत करा, मेलेल्या माणसाला खांदा देण्यापेक्षा जिवंत माणसाच्या हातात हात द्या.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. अश्लेषा मुंगी यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा.रोहिदास लोहकरे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.