शेतीचा उत्पादन खर्च कमी, उत्पादन वाढावे या हेतूने प्रदर्शनाची संकल्पना – चेअरमन, राजेंद्र पवार

देशाच्या शेतीला दिशा देणारे,बारामतीचे दहावे कृषिक प्रदर्शन 2025

बारामती(प्रतिनिधी): जगातील प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करून, शेतीचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढावे या हेतूने गेली 9 वर्षापासून नवनविन संकल्पना घेत प्रदर्शनाची सुरूवात केली असल्याचे ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्राचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावर्षी ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्रातर्फे 10 वे कृषी प्रदर्शन दि.16 ते 20 जानेवारी 2025 रोजी होत आहे. थेट प्रात्यक्षिकावर आधारीत हे कृषी प्रदर्शन 2025 आहे.

पुढे बोलताना श्री.पवार म्हणाले की, तब्बल 170 एकरावर प्रदर्शन भरवून दरवर्षी अडीच ते तीन लाख शेतकरी भेट देतात ही खूप मोठी बाब आहे. शेतीत कोणतीही नव्या तंत्रज्ञानासाठी बियाणांचा वापर करताना प्रत्यक्षात त्याचा झालेला वापर, झालेले उत्पादन या आधारेच नवनविन गोष्टींना सामोरे जावे लागते हे आजवर आपण पाहत आलो आहे.

आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम वुध्दीमत्तेची संकल्पना : फार्म ऑफ द फ्युचर
ऊस व्यवस्थापन तंत्रज्ञानात प्रती एकरी 120 टन उत्पन्न मिळणारा प्रात्यक्षिक प्लॉट तयार केला आहे. मायक्रोसॉप्टच्या व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या मदतीने केव्हीकेमार्फत एआय तंत्र वापरून राज्यातील 1 हजार शेतकर्‍यांच्या शेतात उसाची लागवड करण्यात आली आहे. कमी कालावधीत पारंपारिक ऊस उत्पादनापेक्षा अधिक दर्जेदार उत्पादन या प्रयोगातून शक्य झाले आहे. नेहमीच्या शेती करण्याच्या चौकटीबाहेर जाऊन अधुनिक तंत्राचा अवलंब करण्याचा ट्रस्टने प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला आहे. (AI), IOT, AR, VR या तंत्रज्ञानाचा या कृषिक प्रदर्शनात शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष पाहता येईल.

या तंत्रज्ञानात सेन्सार, ड्रोन, रोबोटीक्स, सॅटेलाईट मॅपिंग, रिमोट सेन्सिंग इ. वापर करून योग्य प्रमाणात खत, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता, सुयोग्य काढणी पश्च्यात तंत्रज्ञान, उत्पन्नाचा अंदाज, हवामान बदलानुसार पिक पद्धतीचे नियोजन, बाजारभावाचा अंदाज, जमिनीची उत्पादकता, मातीची गुणवत्ता, रासायनिक खताचा वापर, यासाठी जमिनीतील सेन्सर, ड्रोन, रोबोट, व सेटेलाईट द्वारे संपूर्ण प्रक्षेत्राचे नियोजन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून ऊस उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.

नाविण्यपूर्ण फळझाडांची लागवड
परदेशी व वाजवी नफा देणारी फळझाडे आपल्या मातीत उत्पादित होतात का? त्याचा खर्च, त्याची बाजारपेठ, त्याचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी शेतकरी बांधवाच्या मनातील अनेक शंकाना उत्तरे मिळणार आहेत. अवाकॅडो, फ्लम, पइर, लिची, रामभूतान, मंगोस्टीन, लक्ष्मणफळ, पेंशनफ्रूट, खजूर अशा अनेक फळझाडांचा यामध्ये समावेश आहे.

परदेशी कटफ्लॉवरची प्रात्यक्षिके
जपान, जर्मनी आदी देशांसह जगभरात वापरली जाणारी शोभिवंत कटफ्लॉवरची उत्पादनेही या ठिकाणी घेण्यात आली असून ते पाहायला मिळणार आहेत. ही भविष्यातील शेतीची दिशा ठरविण्यास मदत ठरणार आहे. गजानिया, स्टवेकिया, पिटीलोटस, निमोनियम, जिनिया इ. जातींची फळझाडे पाहायला मिळणार आहेत.

फुलशेती
शेतकरी काही वर्षापासून शेवंतीला पसंती दर्शवीत आहेत. जगभरातील तब्बल 29 प्रकारच्या रंगीत व विविध वाणांच्या शेवंतीची प्रात्यक्षिके या ठिकाणी उभारण्यात आली आहेत. फुलशेती कृषिकमध्ये भविष्यातील आश्र्वासक शेतीसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.

काळा टोमॅटो व 29 प्रकारचे टोमॅटोचे देशी वाण
पॉलिहाऊस किंवा शेडनेटमध्ये पिकविलेल्या भाजीपाल्याचा दर्जा राखला जातो. स्टेजिंगच्या सहाय्याने टोमॅटोचे पीक खुल्या जागेतूनही अगदी 40 फूट उंचीपर्यंत घेऊन ते अधिक काळासाठी उत्पादन देणारे व अधिक उत्पादन देणारे ठरू शकते. अधिक दर्जेदार व उत्पन्न देणारे पीक कमी उत्पादन खर्चात कसे घेतात हे प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहता येणार आहे.

काळ्या, जांभळ्या व विविध आकारातील टोमॅटोचे 29 देशी वाणाचे उत्पादित प्रकार आहेत तेही पाहता येणार आहे.

निळी व लाल केळी, एक खोड आधारीत डाळींब, एकाच वर्षात उत्पादन होणारी बुलेट द्राक्षे, स्टार फ्रूट, झुकिनी, काळा कांदा, चिया, करटोली, शुगर बीट, चायनीज कोबी, मॅगोस्टीन, खरबूज, तैवान पेरू, थायलंडचा फणस!

या प्रदर्शनात प्रत्यक्षात उत्पादित केलेली निळी व लाल केळीची उत्पादन पध्दत व बाजारातील महत्व पाहता येणार आहे. डाळींबावर रोगकिडीचा होणारा अटकावाबाबत माहितीही याठिकाणी मिळणार आहे. एकाच वर्षात लागवडीपासून बहार धरून उत्पादीत होणारी द्राक्ष लागवड पध्दत, कृषी विज्ञान केंद्राने पहिल्यांदाच विकसित केलेला रत्नदिप पेरू, तैवान पेरू, थायलंडचा फणस, चायनीज कोबी अशी विविध देशांतील पिकं पाहता येणार आहे.

तिखट काळी मिरची व विविध प्रात्यक्षिके
जगातील नव्या व देशी वाणांची प्रात्यक्षिके या ठिकाणी उभारण्यात आली असून, अधिक तिखट मिरचीचे उत्पादनासह अधिक दर्जेदार व उत्पादन देणारी मिरचीचे वाण पाहता येतील.

जिरायती शेतीसाठी ज्वारीचे विविध वाण
जिरायती भागातील शेतकर्‍यांना आश्र्वासक उत्पन्न म्हणून कमी पाण्यात येणारी ज्वारी, अधिक उत्पादन देणारी व गोडीला असणारी तुर्कस्थानची देशी वाणाची बाजरी, पौष्टीक व बाजारात मागणी असणारा चियाची प्रात्यक्षिके पाहता येतील.

कापसाचे नवे तंत्रज्ञान
विदर्भ व मराठवाडयात कापसाची शेती मोठी मात्र कमी उत्पादन व लहरी बाजारभावामुळे अडचणीही तितक्याच. नव्या पध्दतीने लागवड केल्यास अधिक उत्पादन व मशीनच्या आधारे कापूस वेचणीची पध्दत, उत्पादन खर्चात बचत करणे शक्य होणार आहे.

स्वतंत्र पशुदालन
देशातील विविध जातींची जनावरे, गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंड्या, अश्व, श्वान यांचेही एक स्वतंत्र पशुदालन उभारले आहे व दुध उत्पादनाची स्पर्धाही होणार आहे.

भरडधान्य
(श्री धान्य) (Millets)

कोडो, मात्रा, सामा, वरई, हिरवा सावा, राळे, नाचणी, ज्वारी, बाजरी त्याचे आहारातील महत्व, प्रक्रिया पदार्थ निर्मिती जसे कि मिलेट, रवा, मैदा, आटा, कुकी, बिस्किटे, शेवई, पास्ता, इडली मिक्स, खिचडी मिक्स इ. उपयुक्त अन्नद्रव्ये यांची ओळख व प्रत्याक्षिके पहावयास मिळणार.

भोपळा, शेवगा, काकडी, कलिंगड, खरबूजाच्या विविध वाणांची प्रात्यक्षिके, मक्याची चायनीज तंत्राद्वारे होणारी लागवड व त्याचे फायदे अल्पभूधारकांसाठी कमी खर्चात शेळी, कोंबडी व मत्स्यपालनाचे तंत्रज्ञान पहावयास मिळणार

अल्पभूधारकांना कमी जागेत व कमी खर्चात एकाच ठिकाणी मांडणी पध्दतीने त्रिस्तरीय शेळी, कोंबडी व मत्स्यपालन करता येऊ शकेल.

मध्यम व लहान शेतकर्‍यांसाठी अंतरमशागत लागवड, फवारणी, पेरणीसाठी यांत्रीकिकरणाची प्रात्यक्षिके, होमिओपॅथीचा वापर, सुधारित पीक तंत्रज्ञान, डच डेअरी तंत्रज्ञान, विदेशी फळपीक माहिती, तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत भविष्यातील तंत्रज्ञान या ठिकाणी पाहता येईल.

या वर्षी नेदरलँड, चीन, अमेरिका, इस्त्राईल, ब्राझिल, स्पेन, इटली, जर्मनी, अफ्रिका, फ्रान्स, थायलंड, कोरीया, जपान, इंग्लैंड(UK), मेक्सीको, स्विडेन, तुर्कस्थान, ऑस्ट्रेलिया इ. देशांतील विविध AI, सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान बियाणे, खते, औषधे, मशिनरी, पॉलीहाउस, लागवड तंत्रज्ञान, स्मार्ट टुल्स पाहण्याची नामी संधी उपलब्ध होणार आहे.

जपान येथील बायोफ्लॉक यंत्रणा, नेदरलैंड, स्पेन, जर्मनी, थायलंड इ. देशातील विषमुक्त शेती उत्पादनासाठी आधुनिक औषधे, सेन्सर तंत्रज्ञानावर आधारित नेदरलँड, इंग्लंड, अमेरिका देशातील प्रगत मशिनरी, इस्त्राइल येथील सूक्ष्म सिंचन प्रणाली, इटली येथील सेन्सर चलित मशिनरी तंत्रज्ञान असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!