बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगता सभा मोठ्या दिमाखात व तोबा गर्दीने झाली. यामध्ये पवार साहेबांचे भाषण लक्षवेधी ठरेल अशी मतदारांमध्ये उत्सुकता पहावयास मिळाली होती. मात्र, साहेब आले आणि साहेबांनी ज्याप्रमाणे इतर तालुक्यात गद्दार उमेदवार..पाडाऽ..पाडाऽ..पाडाऽऽ असे म्हणाले तेच बोल बारामतीत म्हटले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली दिसत होती.
काही मतदारांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, साहेबांनी गद्दार उमेदवार..पाडाऽ.. हा उल्लेख न केल्याने अजित पवार गद्दार नाहीत हे सिद्ध होत आहेत. विशेष म्हणजे पवार साहेबांनी सांगता सभेच्या भाषणात अजित पवारांनी काम केले यात दुमत नाही असेही बोलले या दोन्ही वाक्यामुळे जागृत मतदारांनी साहेबांच्या बोलण्याचा चांगलाच तर्क लावला. काहींनी तर अजित पवार आता निवडून येणारच असेही हातावर टाळी मारीत बोलत होते.

सांगता सभेत पवार साहेब नक्कीच अजित पवार यांच्याबाबत बोलतील किंवा अजित पवार यांच्यामुळे कुटुंबात निर्माण झालेले कलह व्यक्त करतील मात्र तसे न होता त्यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांच्या कार्याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींना 400 पार करून घटनेत दुरूस्ती करावयाची होती. मतदार सुज्ञ आहे त्यांनी महाराष्ट्रात 48 खासदारांपैकी 30 खासदार आमच्या पारड्यात दिले. ज्याच्याकडे सत्ता असते त्याचा तो वापर केल्याशिवाय राहत नाही. लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना ते म्हणाले, सध्या बहिणीची अवस्था काय, गेल्या दोन वर्षात 67 हजार 381 अत्याचार महिला व मुलींवर झाले आहेत. तसेच 67 हजार महिला व मुली सध्या बेपत्ता आहेत त्या कुठे गेल्या. शेतकरी महत्वाचा घटक आहे. यांच्या सत्तेत 20 हजारापेक्षा अधिक शेतकर्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केली. कित्येकांच्या घरी जावून त्यांची विचारपूस केली. शेतीवर सोसायटीचे कर्ज, सावकाराचे पैसे फेडण्याची ऐपत नसल्याने आत्महत्या झाल्या. या अशा शेतकर्यांना सरकारने आर्थिक मदत करणे गरजेचे होते. या सरकारने 16 उद्योगपतींचे 80 हजार कोटी कर्ज माफ केले. पण 2 हजार कोटीचे शेतकर्यांचे कर्ज माफ करू शकत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.

मी बारामतीत विद्या प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र, माळेगाव संस्था इ. अनेक संस्था काढल्या. गरीब, शेतकर्यांची मुले शिकली पाहिजे याचा विचार केला. सध्या या सरकारने रोजगार उपलब्ध करून दिला नाही त्यापेक्षा नव्याने उद्योग सुरू केले नाही त्यामुळे युवकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. औद्योगिक क्षेत्र जेजुरीपासून सुरू केले. त्यानंतर बारामती, इंदापूर, भिगवण, रांजणगाव इ. सुरू केले. यामुळे कित्येक युवकांना रोजगार मिळाला. आज या सरकारने कित्येक कारखाने गुजरातला पाठविले. पंतप्रधान देशाचे असतात पण नरेंद्र मोदी गुजरातचा जास्त विचार करतात. युगेंद्र पवार उच्चशिक्षीत आहे, अमेरिकेत शिक्षण पूर्ण केले आहे. लोकांसाठी काम करण्याची त्याने इच्छा व्यक्त केली त्यामुळे त्यास संधी उपलब्ध करून दिलेली आहे. विद्या प्रतिष्ठान सारख्या 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेचे अर्थकारण ते पाहत आहेत असेही ते म्हणाले.
युगेंद्र पवार यांनी बारामती तालुका पिंजून काढला आहे. मतदारांचे प्रश्र्न समजून घेतले आहे त्यांच्याशी सुसंवाद साधला आहे. त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांनी उपस्थित मतदारांना प्रश्र्न करीत म्हणाले की, बारामतीचे नाव घेतले की बारामती…त्यावर एकच आवाज पवार साहेबांची असा प्रतिसाद उपस्थित मतदारांनी दिला.
आम्ही जे काही कामे केली त्यापेक्षा जास्त तो काम करू शकतो असे पवार साहेबांनी युगेंद्रबाबत बोलताना सांगितले.
यावेळी युगेंद्र पवार, उत्तम जानकर, खा.अमोल कोल्हे, खा.सुप्रिया सुळे, सक्षना सलगर व विकास लवांडे यांनी परखडपणे आपआपले मत मांडले.