मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीत राष्ट्रीयमंत्री म्हणून पंकजा मुंडे व विनोद तावडे यांची आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी यासंदर्भातली घोषणा केली.
राष्ट्रीय सचिव म्हणून विजया रहाटकर आणि सुनील देवधर तर अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नागपूरचे जमाल सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपातले नाराज नेते एकनाथ खडसे यांना मात्र यादीत कोणतंही स्थान देण्यात आलेलं नाही.
पंकजा मुंडे यांचा परळी मतदार संघातून पराभव झाला होता. नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर मेळावा घेऊन आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर घेतलं जाईल असे वाटत होते. या सगळ्या गोष्टींमुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देऊन भाजपाने त्यांची नाराजी दूर केल्याचं बोललं जातं आहे.
विनोद तावडे शिक्षणमंत्री होते. विधानसभा निवडणुकीत यांना तिकिट नाकारण्यात आले होते. पक्षाच्या या निर्णयामुळे ते नाराज होते मात्र नाराजी जाहीर केली नाही. एकनाथ खडसे यांना मात्र या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही. खडसेंची दोन ते तीन दिवसांपूर्वी ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकार्यांची नावं जाहीर केली. यामध्ये कर्नाटकातील भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांची भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
डॉ. रमन सिंह, मुकुल रॉय, अन्नपूर्णा देवी, बैजयंत जय पांडा यांची भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राजकुमार चहर यांची किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय, सीटी रवी यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी बिहारच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये बदल करण्यात आले असल्याचे कळते.