संपूर्ण देशात अनेक जाती समुहाचे लोकं गुण्यागोविंदाने नांदत आहेत. भारतीय संविधानाने दिलेल्या हक्क व अधिकारानुसार सर्व जाती समुहाचे लोकं त्यानुसार अनुकरण करीत असतात. प्रत्येक जाती धर्मात एक ना अनेक गुन्हेगार असतात, त्यांची मानसिकताच खराब असते. गुन्हेगाराला जात नसते असेही छाती ठोकपणे प्रत्येक समाजातून सांगितले जाते त्याचा स्वीकार सुद्धा प्रत्येक नागरिक करीत असतो यात शंका नाही.
बदलापूर याठिकाणी एका नराधमाने पिडीतावर अन्याय केला त्याबाबत संपूर्ण देश व महाराष्ट्र हादरला. प्रत्येक नागरिकांच्या मनात या नराधमाबाबत सूडाची भावना व्यक्त होत होती. तो कोणत्या जातीचा, धर्माचा पंताचा याबाबत कोणीही विचारणा केली नाही. उलट अशांना फाशीद्या, हत्तीच्या पायी तुडवा किंवा नागरिकांच्या ताब्यात द्या अशा तीव्र भावना व्यक्त होताना दिसत होत्या. म्हणतात ना, कावळा बसायला फांदी तुटायला असा प्रकार काहीसा घडला आणि या नराधमाने पोलीसांवर हल्ला केला आणि पोलीसांनीच त्याच्यावर हल्ला करून त्याच मृत्यूच्या दारी पाठविले. याकृत्याबाबत सर्वस्तरातून स्वागत झाले. मात्र, कायद्याच्या चौकटीतून संबंधित पोलीस व व्यवस्थेवर बोट दाखविण्यात आले.
असाच काहीसा प्रकार पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात झाला. 80 वर्षाच्या वृद्धाने 26 वर्षाच्या दिव्यांग मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. अत्याचार करणार्या किंवा गुन्हेगाराला जात नसते याप्रमाणे सदरचा प्रकार नागरिकांच्या समोर येणे गरजेचे होते. मात्र काही कडव्या संघटनांनी सदरचा वृद्ध विशिष्ठ समाजातील आहे आणि या समाजाने आपल्या समाजातील मुलीवर अत्याचार केले आहे सर्वांनी एक झाले पाहिजे या समाजाला जागा दाखविली पाहिजे असा सोशल मिडीयावर प्रचार केला. यामुळे गुन्हेगाराच्या जातीतील लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला, गावात एका मनाने, दिलाने राहणारी मंडळी एकमेकांना तराजूत पहावयास लागले. गावातील सामाजिक शांतता भंग होईलकी काय अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली.
बदलापूर याठिकाणी झालेली घटना आणि पुणे ग्रामीणमध्ये झालेली घटनेतील गुन्हेगार आहेत. हे कोणा जाती,पातीचे,धर्माचे व पंताचे आहेत हे काही लोकांना घेणं-देणं नसताना, काही धार्मिक कडव्या संघटनांनी थेट जातीचा उल्लेख करीत सर्वांनी एकत्र झाले पाहिजे असे म्हणून त्या समाजावर बोट दाखविले. आज बदलापूर मध्ये झालेले गैरकृत्य कुठे झाले, कोणत्या शाळेत झाले त्याचे नाव त्या संस्थेतील व्यवस्थापक, मालकांचे नाव आजपर्यंत पुढे आले नाही. मात्र, पुणे ग्रामीणमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत त्या वृद्धाचे व त्याच्या जातीचा एवढा प्रचार करण्यात आला की, या वृद्धाची जात म्हणजे इतर जातींवर अन्याय करणारी आहे असा समज या काही कडव्या संघटनांनी पसरविला.
संविधानाने प्रत्येक जात, धर्म, पंतांना एकसमान न्याय, हक्क दिलेला असताना एकाच जातीचा तिरस्कार का केला जातो हेच अद्याप समजलेले नाही. याच जातीवर का लादले जाते, शब्दांचा अपभ्रंश सुद्धा केला जातो. व्हिडीओमध्ये छेडछाड केली जाते असे करून हे कडव्या संघटनांना काय साध्य करायचे आहे. व्हिडीओमध्ये केलेली छेडछाड जर तपासली तर ज्या कोणी सदरचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पाठविला त्यावर आयटी ऍक्टनुसार कारवाई होऊ शकते. मात्र, या जातीतील मंडळी जास्त तोंडाला लागत नाही. या मातीशी एकनिष्ठ आहेत काही आयात झालेली मंडळी एकनिष्ठ असतील का याची शाश्वती देता येणार नाही. या मातीत जन्म घेतलेली याच मातीत गाढले जाणारे इमाने इतबारे आहेत यात तिळमात्र शंका नाही.
काही राजकीय मंडळी, पक्ष स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी काही सामाजिक संस्था किंवा कडव्या संघटनांना पुढे करून आपल्या पदरात काय पडेल का? हे पाहत असते. हे सर्व निवडणूकीच्या तोंडावर पहावयास मिळते. राजकीय मंडळीपेक्षा —परवडते अशी अवस्था यांची असेल तर या लोकांवर किती विश्र्वास द्यायचा हे सामाजिक भान जपणार्या मंडळींनी जाणले पाहिजे. अशा गैरकृत्यामुळेच आपण महासत्तेपासून दूर आहोत. जाती-जातीत तेढ निर्माण करून स्वत:चा स्वार्थ साधणार्या मंडळींमुळे आपण महासत्ता होण्यापासून कोसो दूर आहोत. जे महासत्ता आहेत त्यांना आपण महासत्ता झालेले कसे आवडेल हेही आपण जाणले पाहिजे. एकमेकांमध्ये जाती-जातीत झुंझवत ठेवणे हेच त्यांचे लक्ष आहे.