राजकीय मंडळींना प्रशासनाची मिळत असलेली साथ यामुळे डीजे संस्कृती रूजविण्याचे काम होत असल्याचे लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्र्वभूमीवर दिसून येत आहे. प्रशासनाने ठरविले तर संपूर्ण देश व राज्य चालविण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. मात्र, प्रशासन का म्हणून राजकीय मंडळींना बळी पडत असतात हेच कळत नाही.
डिजेच्या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींच्या जीवाची घालमेल होत असते. या आवाजामुळे छाती धडधडने, श्र्वासावरील नियंत्रण सुटणे अशा तक्रारीचा ओघ वाढत असताना सुद्धा अशा कर्कश डिजेवर कारवाई होत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे.
ज्या-ज्यावेळी लोकसभा व विधानसभा निवडणूका तोंडावर किंवा उंबरठ्यावर येतात त्या-त्यावेळी कायद्याची पायमल्ली होताना दिसते. कर्कश आवाजाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे कडक आदेश असताना सुद्धा त्याची पायमल्ली राजकीय व प्रशासनाकडून होत असेल तर खुप लाजीरवाणी बाब आहे.
या डिजेमुळे मुक्या प्राण्यांना त्रास होतो. पक्षांचे नागरी वस्तीतून स्थलांतर होते. यामुळे पक्षांचे प्रमाण सुद्धा कामी होत चालले आहे. यासर्व बाबीला प्रशासन व राजकीय मंडळी जबाबदार आहेत. राजकीय मंडळी निवडूका आल्या की, त्यांच्या जवळचे चिलेचपाटी व राजकीय पक्षांच्या आहारी गेलेली काही युवा पिढींना खुष करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकून सहकार्य करा असा भावनिक शब्दांचा मारा करीत कायद्याचा भंग करीत असतात. निवडणूका झाल्या की, सर्वांना कायद्याचे प्रेम ओतु जाते. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही असे वाक्य अधिकार्यांच्या तोंडून बाहेर पडत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे प्रत्येक व्यक्तीवर बंधनकारक असताना प्रशासन व राजकीय मंडळी यास बगल देण्याचे काम करतात.
गावचे गावपण व संस्कृती टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. सध्या ग्रामदैवताच्या पालखी मिरवणूका सुद्धा डिजेच्या तालावर निघत आहेत. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे ह.मोहम्मद पैगंबर(स.) यांच्या जयंतीनिमित्त शांतता भंग होत असेल तर मुस्लीम व्यक्तीपेक्षा मुस्लीमांच्या विरोधात बोलणारी महत्वाची ठरतील कारण ते समाजातील चूका निदर्शनास आणून तरी देतात. ह.मोहम्मद पैगंबर (स.) यांनी काय सांगितले आपण काय करीत आहोत हेच सध्याच्या युवा पिढीला कळत नसेल तर या युवकांना अजुनपर्यंत इस्लामचा अर्थच समजलेला नाही असे म्हणता येईल. तुमची कृती व अनुकरण चुकलं की लोकं नावे ठेवल्याशिवाय राहणार नाही.
डिजे विरोधात त्रयस्त इसमाने आवाज उठविला की, त्यास जातीचा रंग दिला जातो. आमचे सण, उत्सव बंद करण्याचा डाव रचला जात आहे असे बोलून तोंडसुख घेणारी मंडळी दोन पाऊल पुढे असतात. प्रशासन स्वत:हून सण, उत्सवात कर्कश डिजेवर कारवाई करताना दिसत नाही. तक्रार कोणाची आली नाही म्हणून गुन्हे दाखल केले नाही असे म्हणून हात झटकून मोकळे होतात. समाजात काही युवक असे आहेत की, डिजे पूर्णपणे बंद करणेसाठी प्रशासनाला सुद्धा सुनावण्यास पुढे मागे पाहत नाही. नागरिकांनी जर अशा युवकांना पाठिंबा दिला तर डिजे काय वाजतोय असेही या युवकांमधून बोलले जात आहे. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी हा खरा प्रश्र्न आहे.
सध्या बारामतीत राजकीय भूकंप झाल्याने एकाच पक्षाचे दोन पक्ष निर्माण झाल्याने नागरिकांना पर्याय उपलब्ध झालेला आहे. मतदार आपल्यावर खुष राहावा म्हणून हे दोन्ही पक्ष सर्वशक्ती लावीत आहेत. मध्यंतरी दहिहंडीच्या उत्साहात एका मंत्र्याचे पी.ए.ने तर चक्क प्रशासनातील मुख्य अधिकार्याला डिजेबाबत सूट देण्याची विनंती केली आणि म्हणाले बारामतीत काय चालु आहे हे माहिती ना आपणाला त्यामुळे जास्त सांगायला लावू नका असे सांगण्यात आले. या अधिकार्याने दबक्या आवाजात पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले. म्हणजे कोण डिजेला खतपाणी घालते आणि कोण नाही यावरून लक्षात आले असेल.
त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना कायद्याचा धाक असतो. कायद्याचे पालन तंतोतंत होण्यासाठी प्रशासनाची नेमणूक केलेली असते मात्र, प्रशासन जर अशा राजकीय मंडळींच्या भावनिक दमाला बळी पडत असतील तर मग सर्वोच्च न्यायालयाने कितीही आदेश देवो किंवा पत्रकारांनी कितीही बातम्या प्रसिद्ध केल्या तरीही पालथ्या घड्यावर पाणीच असे म्हटले तर वावगे ठरू नये.