इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बाळासाहेब सरवदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे बँकांनी दंडात वर्ग केलेली रक्कम पुन्हा लाभार्थ्यांना मिळण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महत्वकांक्षी योजनेची निर्मिती करून राज्यातील महिला भगिनींना दर महिन्याला 1500 रुपयांनी मदत देण्याचा शासनाकडून अत्यंत धाडसी व योग्य निर्णय घेण्यात आला. माहे जुलै 2024 ते माहे ऑगस्ट 2024 या दोन महिन्याचे एकूण 3 हजार रुपये राज्यातील लाडक्या बहिणींना महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आले. परंतु ते अनुदान लाभार्थ्यांच्या नावावर जमा झाल्यानंतर बँकेने ते अनुदान परस्पर कर्जामध्ये अथवा इतर बँक प्रक्रियेत वर्ग करून घेतले आहे. ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. त्या लाभार्थ्यांकडून त्या खात्याचा अनेक दिवसापासून वापर केला गेला नाही. तसेच खात्यावर कमी रक्कम असल्याने मोठ्या प्रमाणात बँकांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
ही सर्व रक्कम लाभार्थ्याना परत मिळण्यासाठी आर.पी.आय.चे इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन तसेच सर्व बँकांचे व्यवस्थापक यांच्याकडे एका तक्रारी निवेदनाद्वारे कळविले होते. या निवेदनाची दखल घेत. आज एस.एल.बी.सी. या संस्थेकडून राज्यातील सर्व बँकांना आदेश देण्यात आले. की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातील कोणत्याही प्रकारची रक्कम दंडात वर्ग न करता सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.
बाळासाहेब सरवदे यांच्या तक्रारीमुळे ही सर्व रक्कम लाभार्थ्यांना पुन्हा मिळणार आहे. यावेळी सरवदे यांनी ज्या महिला भगिनींना रक्कम मिळाली नाही. अशा महिलांनी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.