अनुसूचित जाती जमातीतील लोकांची पोलीस स्टेशनला हेळसांड!
15 मार्च रोजी सेवा बजाविणार्या महिला ठाणे अंमलदाराची चौकशी व्हावी
बारामती(प्रतिनिधी): अन्यायग्रस्त पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास आल्यानंतर त्याची तक्रार घेतली जात नाही त्यास तासंतास बसून ठेवले जाते. असाच प्रकार माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये घडला आहे. दि.15 मार्च रोजी फिर्यादी वैभव रामचंद्र भोसले (रा.गितानगर, पणदरे, ता.बारामती) यांची तक्रार दाखल करून न घेणार्या महिला ठाणे अंमलदाराची खात्यांतर्गत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 15 मे 2024 रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान वैभव भोसले पणदरे येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाची पालखी मंदिरातून बाहेर निघताना बाहेर रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे पालखीला खांदा देण्यासाठी उभे होते. यावेळी यात्रा कमिटी व ग्रामस्थ उपस्थित होते. फिर्यादी वैभव यांच्या पाठीमागून नारायण आनंदराव कोकरे आले व वैभवच्या खांद्याला धरून ये पारध्या तुझे देवाजवळ काय काम आहे असे जातीवाचक बोलून तू देवाला का शिवला, तू पालखीला खांदा देयचा नाही असे म्हणून मला आईमाईवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मला खाली पाडले. यावर फिर्यादी वैभवने शिवीगाळ का करता जाब विचारला असता ये पारध्या तू काय माझे वाकडे करणार तुला करायचे ते कर तुझ्याकडे बघतो अशी धमकी दिली. याबाबत माळेगाव पोलीस स्टेशनला गु.र.नं.138/2024 नुसार भा.द.वि.कलम 323, 504, 506 व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 अन्वये 3(1)(r), 3(1)(s) व 3(2)(va) नुसार दि.20 मे 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनकसवाडी गावातील जमिन गट नं.51 चा वाद मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. यामध्ये वैभव भोसले यांची पत्नी जागृती भोसले ही फिर्यादी आहे. या जमिनीवर नारायण आनंदराव कोकरे यांनी हक्क दाखविला आहे.
घडलेला प्रकार 15 मार्च व गुन्हा दाखल दि.20 मार्च म्हणजे गेली 5 दिवस संबंधित फिर्यादीची फिर्याद घेण्यास संबंधित माळेगाव पोलीस स्टेशनने टाळाटाळ केली. दि.15 मार्च रोजी फिर्यादी वैभव भोसले व त्यांची पत्नी जागृती भोसले यांनी त्या दिवशी सेवा बजाविणार्या महिला ठाणे अंमलदार यांना फिर्याद घेण्यास विनंती केली असता, साहेब आल्यावर फिर्याद घेते तोपर्यंत बसा असे सांगितले. रात्रीचे 1 वाजल्यानंतर वरिष्ठ पोलीस आणि कमिटीच्या समोर सदरचा प्रकार मांडला मात्र, यावेळी सुद्धा फिर्याद घेण्यात आली नाही. जर दुसर्या दिवशी किंवा त्याच रात्री वैभव भोसले यांना व यांच्या कुटुंबियांचे काही बरे वाईट झाले असते त्यास जबाबदार कोण असते हा खरा प्रश्र्न आहे.
वैभव व त्यांची पत्नी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना लेखी स्वरूपात तक्रार सुद्धा दाखल केली. तरी सुद्धा कोणीही दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यावर वैभव भोसले यांनी थेट पुणे ग्रामीण पोलीसचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांना फोनद्वारे हकीकत सांगितली असता, तातडीने माळेगाव पोलीस स्टेशन जागे झाले आणि दि.20 मे 2024 रोजी तातडीने फिर्याद घेऊन संबंधित अन्यायग्रस्तावर गुन्हा दाखल केला.
आजही पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यास गेल्यानंतर बसवून ठेवण्याचे प्रकार पहावयास मिळत आहे. माळेगाव पोलीस स्टेशनचे दि.15 मे रोजी असणार्या महिला ठाणे अंमलदार यांनी तातडीने फिर्याद दाखल करून घेणे क्रमप्राप्त होते मात्र, पोलीस सेवा बजाविताना कर्तव्यात कसूर केली आहे. त्यामुळे या महिला ठाणे अंमलदाराची खातेंतर्गत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. अन्यथा अशाच प्रकारे कित्येक फिर्यादींना तक्रारी नोंद करण्यात वाट पहावी लागेल.
सदर महिला ठाणे अंमलदार व संबंधित पोलीसांची मानवी हक्क आयोग व पोलीस प्राधिकरण यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे वैभव भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
यापुर्वी सुद्धा वैभव भोसले यांच्या मुलाला नंदन डेअरीच्या विरूद्ध दिशेने भरधाव वेगाने येणार्या एका बड्या नेत्याच्या वाहनाने ठोस दिल्यावर अपघात झाला होता. यामध्ये अपघातग्रस्ताला काही प्रमाणात अपंगत्व सुद्धा आले आहे. या प्रकरणात सुद्धा तपासी पोलीसांनी संबंधित बड्या नेत्याला वाचविण्यासाठी नंबरप्लेट बदलून दुसरे वाहन दाखविले आहे.