इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): पाणी हे जीवन देणारे अमृत असून, पृथ्वीवरील सर्व प्रकारचे जीवन जोपासण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पाणी ही केवळ मूलभूत गरजच नाही तर पाण्याची उपलब्धता हा मूलभूत मानवी हक्कही आहे. या सर्व बाबींचा विचार करून संजय राऊत सर मित्रपरिवाराच्या वतीने निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथे सामाजिक कार्यातून मोफत पाणीपुरवठा केला आहे.
गावाच्या पाणीपुरवठा करणार्या विहिरीमधील पाण्याची पातळी अतिशय खाली गेल्यामुळे निमगाव केतकी गावासाठी होणारा पाणीपुरवठा हा आठ दिवसातून एकदा होत आहे. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व तसेच वापराच्या पाण्याची अत्यंत अडचण निर्माण झाली आहे. गावातील लोकांना एक हजार लिटर पाण्याची टाकी 300 रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. इतकी बिकट परिस्थिती निमगाव केतकी या ठिकाणी असणार्या नागरिकांची झालेली असल्याचे पाहून संजय राऊत सर मित्रपरिवार यांनी आपल्या खाजगी जागेमध्ये बोरवेल घेऊन ते पाणी गावातील नागरिकांसाठी जय किसान कृषी सेवा केंद्र तसेच काळा मळा या ठिकाणी दुसरे बोरवेल घेऊन वस्तीवर असणार्या लोकांसाठी व श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या जवळपास 2 हजार विद्यार्थी यांच्यासाठी व तसेच शाळे समोर असणार्या वृक्षांसाठी पाणी मोफत व 24 तास खुले करून दिले आहे.
संजय राऊत सर हे नेहमीच समाजकार्य करीत असतात त्यांच्या हातून असेच समाजकार्य सतत घडावे. संजय राऊत सर यांनी गावातील नागरिकांसाठी पाण्याची सोय केल्याबद्दल गावातील नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.
यावेळी पाणी पूजन डॉ.स्वप्निल देवकाते यांच्या हस्ते संपन्न होऊन ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी बहुजन समाज पार्टीचे बारामती लोकसभा प्रभारी अजित ठोकळे, श्री केतकेश्वर पतसंस्थेचे चेअरमन गोरख आदलिंग, भलेभले सायकल ग्रुपचे भीमराव बोराटे, कृषी अधिकारी पापत साहेब, पत्रकार नानासाहेब चांदणे, दीपक भोंग, मंगेश शेंडे, नितीन मिसाळ, हनुमंत जाधव, सतीश भोंग, सत्यशोधक प्रतिष्ठानचे प्रदेश सचिव प्रवीण डोंगरे, योगेश कांबळे, दीपक शेंडे, दत्त बुनगे व इतर मान्यवर उपस्थित होते