शाळा महाविद्यालय परिसरात फिरणार्‍या टुकार तसेच रोड रोमियोंना दणका : बारामती वाहतूक पोलीस आणि निर्भया पथकाची कारवाई

बारामती(वतन की लकीर ऑनलाईन): बारामती शहरातील विविध शाळा महाविद्यालय तसेच कोचिंग क्लासेस परिसरात विनाकारण मोटार सायकलवर फिरून तसेच अनेक जणांचा ग्रुप करत संबंधित ठिकाणी बसून विद्यार्थिनींची छेड काढणार्‍या टुकारांना आणि रोडरोमिओंना बारामती वाहतूक शाखा व निर्भया पथकाने चांगलाच धडा शिकवला आहे.

सतत त्रास देणार्‍या टुकार आणि रोड रोमिओंवर कारवाई करण्याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी बारामती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निर्भया पथकाचे कामकाज पाहण्याबाबत आदेश दिले. निर्भया पथकातील पोलीस अमल दार आणि वाहतूक पोलिस यांच्या मदतीने पोलीस निरीक्षक यादव यांनी बारामती शहरातील एम. एस. हायस्कुल, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय परिसर, सातव चौक, फलटण चौकात मोहीम राबवून टुकार मुले, मोटारसायकलचा कर्कश आवाज करत महिलांना विद्यार्थिनींना त्रास देऊन सर्वांचे लक्ष विचलित करत फिरणारे, मोठमोठ्याने हॉर्न वाजवणारे, शाळा आवारात ट्रिपल सीट फिरून मजनूगिरी करून मुलींना त्रास देणारे टवाळखोर, बुलेट गाडीचा सायलेन्सर बदलून मोठा आवाज करणारे ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी महिला मुलींच्या संरक्षणासाठी व त्यांना निर्भय बनवण्यासाठी शाळा महाविद्यालयात भेटी देत मार्गदर्शन करत जनजागृतीचे मोठे काम केले आहे. बारामती शहरातील तक्रारी पाहता लागलीच त्यांनी यावर काम सुरु केले असून कारवायाचे सत्र सुरु केले आहे. त्यामुळे महिला मुलींनी आणि पालकांनी समाधान व्यक्त करत वाहतूक शाखेचे आणि निर्भया पथकाचे आभार मानले आहेत. ही कारवाई बुधवारी आणि आज शनिवार दिनांक 29 मार्च असे 2 दिवस करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरू राहील.

सदरच्या कारवाईत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख पोलीस अंमलदार वनिता कदम पो. कॉ. सुनील धगाटे, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सुधाकर जाधव, प्रदीप काळे, प्रकाश चव्हाण, सिमा साबळे, सविता धुमाळ, अजिंक्य कदम, रेश्मा काळे, माया निगडे, सुभाष काळे, योगेश कांबळे, स्वाती काजळे, रुपाली जमदाडे, अशोक झगडे सहभागी झाले.

तक्रार द्या, तक्रारदाराचे नाव गोपनीय राहील!
महिला व मुलींना कोणत्याही पुरुषांकडून काही त्रास होत असेल तर तात्काळ निर्भया पथकाकडे तर, पो. नि.चंद्रशेखर यादव यांच्या या क्रमांकावर संपर्क साधा. संशयित व्यक्तीची माहिती असेल तर नाव, त्याचे वर्णन, त्याचा वाहन क्र.आणि कोणत्या परिसरात राहतो? याबाबत माहिती मॅसेज करा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. स्थानिक पोलीस स्टेशन आणि निर्भया पथकाचे मदतीने कारवाई केली जाईल. – चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक

नागरिकांनी पुढे येऊन फायदा घ्यावा!

निर्भया पथकाचे काम आणखी प्रभाविपणे करण्यासाठी समन्वयक म्हणुन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सूचित केले आहे. महिला-मुलींच्या संरक्षणासाठी योग्य मार्गदर्शन करून त्याबाबत अंमलबजावणी होईल. नागरिकांनी पुढे येऊन फायदा घ्यावा. – संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग

तक्रारींचे निरसन केले जाईल!
नागरिकांनी आपल्या काहीही तक्रारी असतील तर त्या भागातील संबंधित पोलीस ठाणे आणि निर्भया पथकाला कळवाव्यात. नागरिकांनी केलेल्या कोणत्याही तक्रारींचे पारदर्शकपणे निरसन केले जाईल. – सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!