22 मार्चला स.10 वा. श्री महावीर भवनात संवाद मेळावा
बारामती(प्रतिनिधी): बारामती म्हटलं की पवार साहेब, अनं पवार साहेब म्हटलं की बारामती या समीकरणा पलीकडे जावून विचार केला तर साहेबांमुळे बारामती व बारामतीमुळे येथील व्यापारी असे म्हटले तर वावगे ठरू नये.
पवार साहेबांच्या राजकारणापासून येथील प्रत्येक घटकातील विशेषत: व्यापारी वर्ग ठामपणे तटस्थ उभा होता व आहे. त्याच उद्देशाने खा.शरदचंद्रजी पवार यांनी व्यापार्यांना मेळावा घेण्याचे सांगितले असता बारामती व्यापारी महासंघाने तो घेण्यास नकार दिला. पवार साहेबांचा शब्द पडणारच होता तोच बारामती व्यापारी महासंघाच्या वेगळ्या भूमिकेमुळे स्वाभिमानी व्यापारी महासंघ नव्याने स्थापन करून पडणारा शब्द झेलला.
दि.22 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वा. श्री महावीर भवन, तीनहत्ती चौक बारामती याठिकाणी स्वाभिमानी व्यापारी महासंघ बारामती शहर व तालुक्याच्या वतीने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नव्याने स्थापन झालेल्या स्वाभिमानी व्यापारी महासंघ जात-पात, धर्म-पंथ व राजकीय पक्ष विरहीत आहे. व्यापार्यांना केंद्रबिंदू मानून संघ स्थापन करण्यात आलेला आहे. पवार साहेबांना संघाचे प्रेरणास्थान मानून त्यांच्या उपस्थितीत संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे ऍड.सुधीर पाटसकर, सुनिल सस्ते, संजय सोमाणी व निलेशभई कोठारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. तरी जास्तीत जास्त व्यापारी बंधूंनी 15 मि. अगोदर उपस्थित रहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
पवार साहेब, आपण काय नाही केले यांच्यासाठी…
आजपर्यंत व्यापार्यांचे सर्व प्रश्र्न पवार साहेबांच्या कोर्टातूनच सुटले आहेत. दिपावली पाडव्याला स्वतंत्र बैठक व्यापार्यांची साहेब घेत होते त्यांच्याशी समन्वय संवाद साधत होते हितगुज करीत होते. एवढं करूनही काही व्यापार्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे चक्क पवार साहेबांना टाळले ही खूप मोठी शोकांतिका आहे. या काही व्यापार्यांच्या भूमिकेमुळे स्वाभिमानी व्यापार्यांना बुक्क्याचा मारा सोसावा लागत होते. त्यामुळेच बारामतीत नव्याने, जोमाने स्वाभिमानी व्यापारी संघाची स्थापना झाली आणि त्या संघाचा पहिलाच कार्यक्रम पवार साहेबांच्या उपस्थितीत होत आहे याचा आनंद बारामतीतील स्वाभिमानी व्यापार्यांना झाल्याशिवाय राहत नाही.
पवार साहेबांनी व्यापारी व सहकार क्षेत्रातील अनेक लोकहिताचे कायदे केले होते. साहेबांच्या मते शेतकरी आणि व्यापारी यांच्या विचाराचे सूत्र घेऊन काम केल्यास बाजारपेठेला वेगळे स्थान निर्माण होते. व्यापार सुलभ पद्धतीने झाला पाहिजे आणि चार पैसे शेतकरी व व्यापारी यांना मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेत त्यांनी काम केले. शेतकरी, व्यापारी यांच्याशी संवाद साधणारा एकमेव नेता म्हणून पवार साहेबांकडे पाहिले जाते. आज अशा नेत्याला बारामती व्यापारी महासंघाने टाळले त्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात त्याची वार्ता पसरली. मात्र एक झाले नव्या स्वाभिमानी व्यापारी महासंघाने जन्म घेतला आणि पवार साहेबांना प्रेरणास्थान मानले.