साप्ताहिकामुळे यश…

24 SAPTEMBER 2020

जेव्हापासुन राज्यात व बारामती तालुक्यात लॉकडाऊन व जनता कर्फ्यु लागल्यापासुन सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालय व रूई ग्रामीण रूग्णालयाचा असणारा कर्मचारी वर्ग, सफाई कामगार व असणारे वैद्यकीय अधिकारी याबाबत स्वत: साप्ताहिक वतन की लकीरचा संपादक या नात्याने पाहणी केली असता, पाहणीत रूग्ण तपासण्यासाठी डॉक्टरांची कमतरता भासत होती. सेवा देणारे काही डॉक्टरांना कोरोना विषाणूने घेरले बाधीत केले. यामुळे उपस्थित संख्येच्या निम्म्यापेक्षा डॉक्टर संख्या कमी झाली हे प्रत्यक्षदर्शनी दिसले. जे वैद्यकीय अधिकारी सेवा देत होते त्यांच्यावर अधिकचा भार आला. रूग्ण तपासणी केलीच पाहिजे, त्यांना उपचार दिलाच पाहिजे त्यांना येणार्‍या अडीअडचणी दूर झाल्याच पाहिजे अशी परिस्थिती येथील डॉक्टरांवर येऊन ठेपली होती.

                बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जनरल हॉस्पीटल उभारले. या महाविद्यालयात प्राध्यापक आणि निवासी डॉक्टर मिळून 168 डॉक्टर नियुक्त आहेत. या डॉक्टरांना सहा आकडी पगार चालु आहे. मात्र, सेवा फक्त मासिक वेतन घेण्यापुरती एका दिवसाची असेही केलेल्या पाहणीत आढळले. या विरोधात दि.5 सप्टेंबर 2020 रोजी संबंधीत डॉक्टरांना हजर राहणेबाबत,  ड्युट्या लावणेबाबत व यांचा पगार थांबवण्याबाबत अर्ज देवून बारामतीत या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ज्या रूग्णांची प्राणज्योत मावळली त्या डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार संपादक या नात्याने या महाविद्लयाचे डीन श्री.तांबे यांना दिली होती. या पत्राची प्रत आरोग्यमंत्री, प्रधान सचिव, आरोग्य विभागाचे संचालक, उपसंचालक तसेच केंेद्रीय आरोग्यमंत्री यांना सुद्धा दिली होती.

                या अर्जाचा सकारात्मक विचार करता मंत्री महोदय व वरिष्ठ अधिकार्‍यांनी माहिती घेऊन योग्य ती कारवाई तातडीने करण्याचे आदेश दिल्याने डीन श्री.तांबे यांनी सिल्व्हर ज्युबिली येथे 11 डॉक्टरांची नियुक्ती केली. जे नियुक्त केलेले डॉक्टर उपस्थित राहत नाही त्यांच्या घरी पोलीस लावुन उपस्थित राहण्यास सांगण्यात आले व उपस्थित न राहिल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल असा आदेश दिला त्यामुळे काही प्रमाणात डॉक्टरांनी उपस्थिती दर्शविली.

                या महामारीत डॉक्टर, पोलीस, आरोग्य विभागाचे साफसफाई कर्मचारी यांच्यावर जो ताणतणाव आहे त्यास कोणीही नाकारू शकत नाही. मात्र, काही मंडळी घरात बसुन सहा आकडी पगार घेत असतील व कर्तव्यातून कामचुकारपणा करीत असतील तर सार्वजनिक पैश्यातून पगार घेणार्‍यावर कारवाई झालीच पाहिजे असा रोष सर्वसामान्यांच्या मनातून आल्याशिवाय राहणार नाही. युद्ध सुरू आहे सैन्य जर घरात बसून नुसता पगार घेत असतील तर समोरच्या शत्रुशी दोन हात करण्यापेक्षा स्वत: हार पत्करलेली बरी  असे म्हणावे लागेल. सध्या केंद्र व राज्य शासन आरोग्य खात्यावर  करडी नजर ठेवून आहे. आरोग्य विभागावर पाहिजे तेवढा खर्च करण्यास तयार आहे. मात्र सैन्य रूपात असणारे डॉक्टर मात्र हत्यार टाकून पळून जात असतील व सार्वजनिक पैश्याचा कर्तव्य न बजावता  अपहार करीत असतील तर या लोकांवर कायदेशीर कारवाईचे हत्त्यार उगारलेच पाहिजे. या विषयाबाबत डीन श्री.तांबे बोलताना म्हणाले एवढे डॉक्टर आपल्याकडे नाही, वैद्यकीय महाविद्यालय जीवंत ठेवण्यासाठी या डॉक्टरांची नियुक्ती केलेली असते असे म्हणून बुचकळ्यातच टाकले. मात्र या 168 लोकांचा तर पगार तर शासन करीत आहे ना? मी वेळोवेळी ड्युट्या लावलेल्या असतात मात्र संबंधित रूग्णालयातील प्रमुखांनी त्यांना संपर्क साधुन उपस्थित राहणेबाबत सांगणे गरजेचे आहे. येत नसतील तर त्यांचा रिपोर्ट त्यांनी केला पाहिजे असेही श्री.तांबे यांनी सांगितले. मात्र संबंधित रूग्णालयाचे प्रमुख म्हणतात ड्युटी लावलेले डॉक्टर गेल्या महिन्याभरात आलेच नाही. त्यामुळे नक्की काय हेच अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, सद्यस्थितीला सिल्व्हर ज्युबिली रूग्णालयात डॉक्टर नियुक्त झाले. जो-तो आपआपली दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडीत आहे तेही ताणतणाव मुक्त राहुन याचे समाधान वाटते. असाच एक फेरफटका मारला असता माझी ओळख लपवीत सर्वांच्या चेहर्‍यावर तणावमुक्त वातावरण दिसले सर्व उत्साहाने रूग्णांची सेवा देताना दिसले. या प्रकरणाबाबत मी इतरही वृत्तपत्रांना बातमी दिली होती मात्र यावर कोणीच दोन ओळ लिहिण्याचे धाडस दाखविले नाही याचे दु:ख वाटते मात्र मी जे काही तक्रारी केल्या यामुळे इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना तणावमुक्त केले त्यांना कोरोना होण्यापासुन थोडं का होईना दूर ठेवले याचा मला मनोमन आनंद वाटतो. प्रसिद्धी मिळवणे हा माझा हेतू नव्हे, मात्र कृती प्रत्यक्षात दिसली पाहिजे हा प्रयत्न मी केला एवढं मात्र नक्की!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!