इंदापूर प्रतिनिधी – अशोक घोडके
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी,कार्यकर्ता मेळावा व जाहीर सभेचे आयोजन रविवारी (दि. २५) करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, युवक अध्यक्ष ॲड.शुभम निंबाळकर, सचिन सपकळ, दत्तात्रय बाबर या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
गारटकर म्हणाले की, सकाळी दहा वाजता पोलीस ठाण्यासमोरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा कार्यक्रम होणार आहे. आ.दत्तात्रय भरणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी ते कायम ठाम व ठोस भूमिका घेतात याचा इंदापूरकरांना जुना अनुभव आहे. दीर्घ कालावधीनंतर व बऱ्याच घडामोडी घडून गेल्यानंतर पवार इंदापूरात येत आहेत. संपूर्ण घडामोडींबाबतची आपली व पक्षाची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. त्याचबरोबर इंदापूर तालुक्याच्या भावी काळात विकासाच्यासंदर्भातही ते भाष्य करणार आहेत. या कार्यक्रमास अधिकाधिक शेतकरी, कार्यकर्ते व मतदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ही त्यांनी केले.