नाव चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेचे अस्तित्व संपते असे नाही – खा.शरदचंद्रजी पवार

सातारा: नाव चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेचे अस्तित्व संपते असे नाही. सामान्य माणसांशी संपर्क वाढवला पाहिजे. त्यांना नवे चिन्ह काय आहे ते पोहचवले पाहिजे इतकेच महत्त्वाचे असते असे खा.शरदचंद्रजी पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्ह हे दोन्हीही अजित पवारांना देण्यात आले आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र यावर खा.शरदचंद्रजी पवार यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता ती प्रतिक्रियाही समोर आली. पक्ष आणि चिन्ह दुसर्‍याला दिले म्हणून अस्तित्व संपत नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. सातार्‍यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

खा.पवार पुढे म्हणाले की, पक्षातून लोक सोडून जातात, नवे येतात. या गोष्टी घडत असतात, मात्र असे कधी घडलेले नाही की ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून दुसर्‍याला दिला. नुसता पक्षच दिला नाही तर चिन्हही देऊन टाकले. ठीक आहे, हा निर्णय कायद्याला धरुन आहे असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल नीट लागेल अशी अपेक्षा आहे. दुसरे एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो चिन्ह गेलं तरीही त्याची चिंता करायची नसते. मी आत्तापर्यंत निवडणुका लढलो त्यातल्या पाच निवडणुकांमध्ये चिन्हे वेगवेगळी होती. पहिल्यांदा बैलजोडी होती, नंतर गाय-वासरु आलं, त्यानंतर चरखा हे चिन्ह आले, त्यानंतर हाताचे चिन्ह आले. त्यानंतर घड्याळ आले. वेगळी चिन्हे आपण पाहिली आहेत असेही ते म्हणाले.

राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असल्याच्या निर्णयाचा आधार घेत शरद पवार गटाकडून सादर केलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणार्‍या याचिका फेटाळल्या आहेत. नार्वेकर निकाल वाचताना म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला विधानसभेच्या एकूण 53 आमदारांपैकी 41 आमदारांचा पाठिंबा आहे. तर शरद पवार यांच्याबरोबर केवळ 12 आमदार आहेत. शरद पवार गटाने या दाव्याला कुठेही आव्हान दिलेले नाही. त्यामुळे दोन्ही गटाचे संख्याबळ इथे स्पष्ट होत आहे. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे असे नार्वेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!