इंदापूर: शहरावर सदैव भगवंताची कृपादृष्टी राहावी म्हणून स्व.नारायणदास रामदास शहा, स्व.सुरेशदास शहा व स्व.गोकुळदास भाई शहा या शहा कुटुंबियांनी धार्मिक कार्यात खुप मोठे योगदान दिले असल्याचे मत ह.भ.प.नवनाथ म्हस्के यांनी व्यक्त केले.
शहरातील म.फुलेनगर येथे श्री दत्त प्रतिष्ठानच्या वतीने धर्मनाथ बीजेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात शिवलिला अमृत ग्रंथ पारायणादरम्यान शहा कुटुंबाच्या हस्ते दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी नवनाथ महाराज म्हस्के बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शहरात सौख्य नांदावे यासाठी सर्व धर्मांच्या धार्मिक कार्यात सढळ हाताने मदत करण्याच्या शहा कुटुंबियांच्या सत्प्रवृत्तीमुळे इंदापूरातील धार्मिक एकोपा टिकून आहे. धार्मिक कार्यातील योगदान पुढे असेच अखंडपणे चालत रहावे म्हणून श्री नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख मुकुंद शहा, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी स्वेच्छेने अंगिकारले आहे. शहा परिवारामुळे इंदापूर शहरात अध्यात्म व धार्मिकता जोपासली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.