बारामती: राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवार महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज बारामती तालुका व शहराच्या वतीने पाठिंबा दिला असून बुधवारी बारामती बंदची हाक देण्यात आलेली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांच्या साठी मनोज जरांगे पाटील विविध आंदोलने करत आहेत. जानेवारीत आपल्या लाखो सहकार्यांसह जरांगे पाटील मुंबईत धडकले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या. त्यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले व आंदोलन स्थगित केले. सगेसोयरे यांना जात दाखले देण्याचा अध्यादेश काढला.
त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे तसेच अंतरवली सराटीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आरक्षण आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत सरकारने मराठा समाजास दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवार दिनांक 14 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज बारामती तालुका व शहराच्या वतीने पाठिंबा दिला आहे.