पत्रकारांवर होणारा हल्ला अतिशय निंदनीय : इंदापूरात पत्रकार निखिल वागळे व सहकार्यांवरील हल्ल्‌याचा निषेध

इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर होणारा हल्ला अतिशय निंदनीय असुन, या भ्याड हल्ल्याचा निषेध इंदापूर येथील स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी (दि.10) नोंदवण्यात आला. यावेळी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली.

शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार व आराजक्ता माजवणार्‍या घटना घडत आहेत. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे शुक्रवारी पुणे याठिकाणी नियोजित कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांच्यावर समाजकंटकांनी व विशिष्ट विचारधारेच्या लोकांनी भ्याड हल्ला केला. ही घटना घडवून आणणारे व त्यांचे पाठीराखे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधल्या जाणार्‍या पत्रकारांवर अशा पद्धतीने होणारा हल्ला अतिशय निंदनीय आहे. अशा आशयाचे निवेदन यावेळी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना देण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शैलेश काटे, मार्गदर्शक महेश स्वामी, राहुल ढवळे, सुधाकर बोराटे, देवा राखुंडे, धनंजय कळमकर, सिद्धार्थ मखरे, इम्तिहाज मुलाणी, नीलकंठ भोंग, तात्याराम पवार, श्रेयश नलवडे, गणेश कांबळे, राकेश कांबळे, प्रकाश आरडे, अशोक घोडके,आदित्य बोराटे, मुक्तार काझी, अंगद तावरे, दत्तात्रेय मिसाळ, हमीद आतार, शिवकुमार गुणवरे, अतुल सोनकांबळे यांच्यासह इनायत काझी, संजय शिंदे, अनिल पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!