खरंतर अप्रूप म्हणजे काय ?त्याचा अर्थच सांगता येणार नाही.
कसा सांगणार? कुणाला सांगणार? आजच्या पिढीला?
“पाच रुपयानची कॅडबरी का आणलीस दहाची का नाही आणली?” असा प्रश्न विचारणाऱ्या या पोराला आपण लेमन गोळी फ्रॉक च्या किंवा शर्ट च्या कपड्यात पकडून कशी अर्धी-अर्धी आनंदाने वाटून घेत होतो, हे सांगून तरी पटेल का?
आम्हाला चार आण्याच्या चॉकलेटमध्ये हाताला लावायचं टॅटू स्टिकर भेटलं तरी परमोच्च आनंद व्हायचा.. दोन रुपयाच्या पेनमध्ये 50 पैसे ची रिफील टाकून , तरीपण नाही चालली तर उन्हात ठेवून, तळहातावर चोळून, फुकून फुकून रिफील संपेपर्यंत पेन वापरणारे आपण. रेनॉल्ड् पेन, शाई पेन, मिळालं तरी राष्ट्रपती पदक मिळाल्याचा सारखा अप्रुप वाटायच आपल्याला. कारण ते पेन फक्त निबंध आणि गृहपाठ पुरतेच वापरायचो.
क्वचितच शाईपेन बरोबर शाईची बाटली पण मिळायची. नाही मिळाली तरी शाळेच्या बाहेर च्या दुकानात पेनमध्ये सुट्टी शाई भरून मिळायची की, पण त्यासाठी कधी तक्रार केल्याचे आठवत नाही. म्हणजे तशी पालकांकडे तक्रार करायची असते हेच माहित नव्हतं. पण काही म्हणा त्या शाईच्या बाटली मुळे पेन ची अप्रूपता अजून वाढायची. तीच गोष्ट पेन्सिल ,रबर आणि पट्टीची.. अप्सरा ची पेन्सिल ,नटराज चा रबर, आणि कॅमल कंपास गोष्ट हि खूप मिरवण्यासारखी गोष्ट होती.
पण आता शाळेच्या बुक्स बरोबर पेन्सिल बॉक्स, पेन बॉक्स ,रबर बॉक्स खरेदी करणाऱ्या मुलांना, पेन्सिल हरवली किंवा संपली (असं तर कधी होतच नाही) की घरात दुसरी आहे हे माहीत असतंच. त्यामुळे नवीन पेन, नवीन पेन्सिल मध्ये कसली आली अप्रूपता.. एक्साइटमेंट… हॅपिनेस.. आपण नवीन रिफिल घे म्हणून घरच्यांनी दिलेला सल्ला दुर्लक्ष करून… नवीन पेन साठी शाळेत जाताना हट्टाने नेलेले पैसे… ते कंपास मधे व्यवस्थित आहेत का नाही? हे प्रत्येक तासाला चेक करतानाची धडधड… मधल्या सुट्टी पर्यंतची चुळबूळ… पटकन डबा संपवून शाळेच्या ग्राहक भंडारा पर्यंतची धावपळ.. पेन खरेदीतला आनंद.. आणि कधी एकदा वर्गात सगळ्यांना दाखवतो याची हुरहूर…यांना कशी समजणार? आणि हे सहजासहजी वर्ग मित्राला शंभर-दोनशे रुपयांचा पेन गिफ्ट करतात.
अहो वाढदिवसाला नवीन ड्रेस मिळणं यात पण आप्रूपता होती. कारण सणासुदीला, क्वचित मामाच्या गावी गेल्यावर मिळणारे ड्रेस हक्काचे होते. पण शाळेत एक दिवस, एकट्यानेच, रंगीत ड्रेस घालून जायची मुभा ही फक्त वाढदिवसाला च असायची. आणि तो पण नवीन असेल तर मग दिवसभर जमिनीवर चालायचा विषयच नाही. हसायला काय झालं? खरंच सांगते. आठवलं का नवीन ड्रेस घालून, चॉकलेटचा पुडा हातात घेऊन, सगळ्या शिक्षकांना देण्यासाठी अख्खी शाळा पालथी घालायचो. तसे तर मधल्या सुट्टीत, स्टाफरूममध्ये सगळ्यांना एक साथ चॉकलेट देता आलं असतं. पण मग वाढदिवसाच्या नवीन ड्रेस च्या “स्पेशल फील” ची अप्रूपता राहिली नसती. बर हा फील फक्त एकटीने अनुभवायचा नाही. तर सख्खी मैत्रीण बरोबर हवी फिल वाढवायला, शाळा पालथी घालायला.
लहानपणी माझी आजी कोर्टाच्या कामासाठी आमच्या गावाला यायची. तिला लिहिता-वाचता येत नव्हते. तसं कोर्ट काही आमच्या घरापासून इतकं दूर नव्हतं. पण कोर्टातून तिला पुढची तारीख भेटायची एका छोट्या चिठ्ठीवर लिहून. ती लिहिलेली तारीख तिला वाचून दाखवायची. मग ती 2 रुपये द्यायची. वाचून दाखवली म्हणून नाही खाऊसाठी. खरं तर प्रश्न पैशाचा नव्हताच मुळी. पण तिने दिलेले ते खाऊचे दोन रुपये हक्काचे असायचे. त्यासाठी कुणाशी भांडायला लागायचे नाही. सांगता पण येणार नाही किती वर्षे तिची ती केस चालू होती पण दर महिन्याला मिळणाऱ्या दोन रुपयाची आप्रूपता आत्ता मिळणाऱ्या पगाराच्या कित्येक पट होती. त्यावेळी असं वाटायचं महिन्यातून दोनदा केसची सुनावणी व्हावी.
पार्ले चा एक बिस्किट पुडा तीन भावंडांमध्ये वाटून खायचा हे जणू अंगवळणी पडलं होतं. इतक की त्यासाठी कुणी आम्हाला शेअर करून खा म्हणून सल्ला दिल्याचे आठवत नाही. किंवा “आमचा बाबू शेअर करून खातो” असे पालकांना कधी कौतुक करण्याचा त्रास झाला नाही. पण त्यावेळी तिघांना तीन बिस्किट पुडे दिले गेले असते तर त्याची अप्रूपता आजतागायत थोडीच टिकली असती? आणि आजचं म्हणाल तर आजच्या पालकांनी कधी ती मुलांपर्यंत पोहोचू दिली नाही. एखादी गोष्ट मागायच्या अगोदर हातात येऊन पडते. दोन मुले असतील घरात तर हमखास दोन कॅडबरीचा आणल्या जातात. त्याच्यामुळे त्यांना कधी कॅडबरी दोघात शेअर करून खातात हे कसे समजणार?
तुम्हाला वाटेल “एखादी गोष्ट अप्रूप वाटणे” ही वस्तूच्या “किमती” वर ठरते का? तर अजिबात नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाहीच. तसं असतं तर फक्त सोन्या-चांदीच्या गोष्टीच अप्रूप झाल्या असत्या. आणि नवीन शुभ्र खोडरबर(एकच मिळायचा) पेन्सिल ला टोक केल्यानंतर तयार होणार लाकडी फुल, बर्फाच्या गोळ्यावर परत परत हावऱ्या सारखा मागून घेतलेला लाल रंग, बनपावच्या वरच्या दोन ऐवजी तीन मिळालेल्या टूटीफ्रूटी, नवीन ड्रेस चा विशिष्ट वास(ठराविक प्रसंगीच मिळायचा), आईच्या हातची पुरणपोळी(सणासुदीलाच बनायची ना), नागपंचमी च्या बांगड्या, मेहंदी ती पण वाटीत तयार करून सुई ने लावायची (मेंदीचा कोन मिळायचाच नाही ज्याला जमायचं ते घरी बनवायचे), ज्यांच्या घरी टीव्ही आहे त्यांच्या घरी टीव्ही पाहण्यास जाणे, (अपमान सहन करून) आठवड्यातून शुक्रवार शनिवार चा हिंदी पिक्चर(चॅनेल चा सुळसुळाट नव्हता) रविवार चा मराठी चित्रपट, दिवाळीतील मिठाई, गुढीपाडव्याचा गुढीचा हार(जास्त गोड पदार्थ तोच ऑप्शन होता) लग्नातील गोडाचे जेवण, 50 पैसे देऊन एक तासासाठी घेतलेली भाड्याची सायकल, अर्ध्या तासाने पाऊण तासाने वेळ संपली का हे विचारायला जाणं, गणपतीच्या काळातील देखावे, पडद्यावर दाखवला जाणारा सिनेमा, लग्नातील मजा , वऱ्हाड बरोबरचा प्रवास, वर्षातून फक्त एकदा ते दोनदा मिळणारी खेळणी, ती पण बापरे काढायचं म्हटलं तर खूप मोठी यादी आहे.
कदाचित न थांबणारी न संपणारी.. मग आत्ता आपल्या मुलांमधली ही अप्रुप ता नक्की गेली कुठे? त्यांची यादी करा बघू.. काळानुसार बदलली म्हणावं… तर कालच खेळणं आज त्यांना नको वाटतं.. एकदा एका फंक्शनला घातलेल्या ड्रेस जुना होऊन जातो.. कितीही मोठी कॅडबरी आणली तर त्याच्या पेक्षा मोठी हवी असते.. आणि नकळत याला जबाबदार आपण तर नाही ना? नाही कसे? न मागता हट्ट करता वारेमाप खेळणी, कपडे ,वस्तू आणून देणे. बाराही महिने घरात गोडाधोडाच बनवणे, टीव्ही ,मोबाइल, चॅनेल्स ,नेटवर्क वापरावर कंट्रोल नसणे. त्या वस्तूची “किंमत” समजायच्या आत त्याच्या हातात आणून देणे. नगावर आणायच्या गोष्टी आपण आता डझनावर आणायला लागलो. जाहिरातींचा भडिमार, एकेका गोष्टीची भरमसाठ उत्पादने, गोष्टींचा अतिरेक वापर, गरज नसताना आणलेल्या वस्तू… याची पण यादी खूपच मोठी आहे हो.. न संपणारी…
कदाचित त्यामुळेच आज घरात असलेल्या लाखो रुपयांच्या दुर्बिणीचे आणि चंद्रावर घेतलेल्या प्लॉट चे पण “अप्रूपच” राहिले नाही … तेच तर सांगते मी “अप्रूपता” ही किंमतीवर अवलंबून आपल्या वेळी पण नव्हतीच कधी आणि आत्ता पण नाहीये, कधीच नसणार …
पण शेवटी ती “मानण्यावर” आहे.
सौ अभिजिता नवनाथ जगताप.
abhijita.jagtap@gmail.com