इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहीरीच्या रिंगचे काम सुरू असताना, त्या विहीरीत मुरूम व माती कोसळून कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला आणि सर्वत्र शोककळा पसरली. या दुर्घटनेच्या तव्यावर मात्र इंदापूरचे नेतेमंडळी राजकीय पोळी भाजण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे.
कोण म्हणते विधानसभेत प्रश्र्न उपस्थित केला की, तातडीने उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी 5 लाख रूपयांची मदत राज्य शासनाने जाहीर केली तर कोण म्हणते थेट मुख्यमंत्र्यांना कामगारांना आर्थिक सहाय्य मिळण्याचे पत्र दिले आणि प्रत्येकी 5 लाख रूपयांची मदत जाहीर झाली. संपूर्ण इंदापूर तालुका या दुर्घटनेची हळहळ व्यक्त करीत असताना, श्रेय लाटण्याचे काम दोन्ही पक्षातील सुभेदारांनी सुरू केल्याचे दिसत आहे.
दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ –
दोन मांजरी होत्या. एक काळी तर दुसरी गोरी. त्यांची फारच मैत्री होती. एके दिवशी त्या दोघींना फारच भूक लागली होती. तेवढ्यात काळ्या मांजरीला एक पोळी मिळाली. काळी मांजर म्हणाली, मी आधी पोळी खाणार तर गोरी मांजर म्हणाली, मी अगोदर पोळी खाणार. बराच वेळ दोघींची भांडणं चालू होती. त्या दोघींना समोरून येणारं माकड दिसलं. गोरी मांजर म्हणाली, आपण त्या माकडाकडून पोळीचे दोन सारखे भाग करून घेऊ. काळी मांजर माकडाला म्हणाली, ’माकडा दादा, आम्हाला या पोळीचे दोन सारखे भाग करून द्या’. माकडाने तराजू काढलं. पोळीचे दोन भाग केले. दोन्ही तराजूमध्ये टाकले.
एका तराजूमध्ये थोडी जास्त पोळी होती. म्हणून त्याने त्या पोळीचा एक तुकडा मोडून तोंडात टाकला आणि खाऊन टाकला. नंतर परत तराजूमध्ये पोळी टाकली तर दुसर्या तराजूमध्ये थोडी जास्त पोळी भरली. त्याने त्या पोळीचा तुकडा मोडला आणि तोंडात टाकला. प्रत्येक वेळी पोळी कमी-जास्त होत होती. असं करता-करता त्याने प्रत्येक वेळी एक एक तुकडा खाता-खाता शेवटी सर्वच पोळी खावून टाकली. त्या दोघी मांजरी रागाने त्याच्या अंगावर धावून गेल्या. शेवटी माकड पळून गेलं. मित्रांनो, या गेष्टी वरून आपल्याला कोणता बोध मिळाला हे या दोघांना सांगण्याची गरज नाही.
भाजपने आपल्या राजवटीत गैरव्यवहार, अपहार, भ्रष्टाचार आदी शब्द अक्षरशः षंढ ठरवले आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही. इंदापूरचा विकास कसा झाला, कोणी केला हे सुज्ञ नागरीकांनी उघड्या डोळ्यांनी केवळ पाहिलीच नाही तर अनुभवलीही आहे. मात्र, विरोधकांसाठी संजयची दिव्यदृष्टीने पाहणार्या आणि सोयीनुरूप गांधारीप्रमाणे डोळ्यांवर पट्टी ओढणार्या सत्ताधार्यांना त्याचे यत्कींचितही शल्य नाही असेही नागरीकांमध्ये बोलले जात आहे.
सरते शेवटी एवढं नक्की आहे की, आपण सगळे मिळून खाऊ या सहकार तत्त्वावर चाललेल्या भ्रष्टाचाराच्या राजकीय यज्ञात सर्वसामान्य नागरीकांनी कराच्या रूपाने भरलेल्या पैशांचा स्वाहाकार चालतो. तो थांबविण्याचा सर्वस्वी अधिकार सर्वसामान्य मतदारांकडे आहे, तो अधिकार मतदार कधी बजावणार हेच अद्याप उघड झालेले नाही.
जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून, जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा, तो माझा शिवबा होता. असे शिवबा जनतेला पुन्हा एकदा मिळावे अशी आशा सर्वस्तरातून व्यक्त केली जात आहे.