राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नुकतेच आठवे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले. अधिवेशन म्हणजे देशात व राज्यात सुरू असलेल्या घडामोडी व त्या घडामोडीवर पक्षाचे कार्य म्हणता येईल. या अधिवेशनात राज्य संघटक, जिल्हा प्रमुखांची उपस्थिती होती. राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी घड्याळ्याच्या काट्याला (वेळेला) महत्व दिले म्हणून आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा धसका इतर पक्ष घेतल्याशिवाय राहत नाही. आजही त्यांनी पक्षाची केलेली बांधणी मजबुत आहे हे नाकारून चालणार नाही.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, मावळ, पिंपरी चिंचवड, वेल्हा इ. पाहिले जाते. प्रत्येक पक्षात एक सुत्र आहे भाकरी फिरली पाहिजे ती करपता कामा नये. बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विचार केला असता, पदांची भाकरी फिरली तर नाहीच उलट ती करपून जळून खाक झालेली आहे. पक्षाचे संघटन कौशल्य कुठे दिसत नाही. कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आलेली दिसते. पक्षाच्या नावावर आर्थिक गडगंज झालेल्या व्यक्ती सत्ता नसल्यावर पडद्यामागे जात आहेत. सत्ता असल्यावर पुढे..पुढे करीत असतात. शेवटी तळागळातील कार्यकर्ताच पक्षाशी एकनिष्ठ राहतो व राहिलेला दिसतो.
ज्या बारामती शहरात लोकसभा व विधानसभेला नागरीक भरभरून नेत्यांवर प्रेम करतात त्या नागरीकांच्या हाकेला कोण धावते हा खरा प्रश्र्न आहे. शहरात युवकांचे संघटन काय आहे. एखादा कार्यक्रम घेणेचा झाल्यावर पदाधिकारी तेवढे पांढरे कपडे घालून मिरवतात पण दहा कार्यकर्ते बरोबर घेऊन येण्याची धमक त्यांच्यामध्ये नाही. ज्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती नाही अशांना मात्र, मोठ-मोठी पदे दिले जातात ही खूप मोठी शोकांतिका आहे.
राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेबांनी चार मुद्दे प्रखरतेने मांडले ते मुद्दे घेऊन जर प्रत्येकाने आपले राज्य मजबुत करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच सध्या काट्यावर जे घड्याळ आहे ते घड्याळ्याच्या काट्यावर तंतोतंत चालल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये पवार साहेबांनी सांगितले की, देशात नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुका आल्या आहेत यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला चमक दाखविण्याची वेळ आहे. या निवडणुकांमध्ये 50 टक्के महिलांना प्राधान्य असणारच आहे. ज्याप्रमाणे 50 टक्के महिलांना संधी दिली जाणार त्याच पटीत 50 टक्के युवकांना संधी देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या अधिवेशनातून गेल्यानंतर राज्य प्रमुख व जिल्हा प्रमुखांनी भारतीय जनता पार्टी सारखे सांप्रदायिक पक्षाला दूर ठेवणारे जे इतर पक्ष आहेत त्यांच्या बरोबर जावून त्यांच्याशी वेगवेगळे कार्यक्रम लावण्याची गरज आहे. नागरीकांच्या समस्या, बेरोजगारी, अत्याचार इ. प्रश्र्न शांतीच्या मार्गाने सोडविल्यास यामधून युवकांचे नेतृत्व पुढे आल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. शेवटी सांगितले की, आठवड्यातून फक्त दोन दिवस संघटनात्मक बांधणी करण्यासाठी द्यावा यामधून सर्वसामान्य नागरीक पक्षाच्या जवळ येईल व खंबीर असे नेतृत्व निर्माण होईल.
आज प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात होते की, दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय अधिवेशनाचा मी साक्षीदार ठरेल मात्र, जिल्हा, तालुका व युवकांच्या संघटनात्मक बांधणी नसल्याने आज सर्वसामान्य कार्यकर्त्याला याचा लाभ घेता आला नाही. राष्ट्रीय अध्यक्षांनी या अधिवेशनात दिलेल्या सूचना यापुढे काम कसे करावे याबाबत कितपत जिल्हा, तालुका स्तरावर विचार केला जाईल याची शाश्वती नाही. कारण पुणे जिल्ह्यात तरी कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ कशी दूर होणार हे न उलघडणारे सत्य आहे.
एक तास राष्ट्रवादीसाठी जो उपक्रम सुरू आहे. त्यापेक्षा आठवड्यातून दोन दिवस पक्षाच्या कामासाठी प्रत्येकाने दिला तर घड्याळ्याच्या काट्यावर पक्षाची घोडदौंड सुरू राहील. अन्यथा संघटनात्मक कार्य पाहता काट्यावर घड्याळ आहे असे म्हणावे लागेल. येणार्या काळात परिस्थिती बदलायची असेल तर युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी नविन चेहर्यांना संधी देणे ही काळाजी गरज आहे.