1 मे सकाळी 6.30 ची वेळ. जिल्हाधिकारी कार्यालयात सगळ्यांची लगबग सुरु. सजावट झाली का? तोरण लावले का ? रांगोळी काढून झाली का? आणि हो कोविडच्या नियमांचे पालन करण्यासाठी सॅनिटायजरची सोय तसेच येणार्या प्रत्येकाला मास्कची सोय झाली का ? इथपासून ते अगदी समईच्या वाती व्यवस्थित लावल्या का इत्यादी गोष्टींची खात्री करण्यात आली. ही सगळी तयारी पाहता-पाहता 9 कधी वाजले लक्षातच आले नाही. पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशातील दोन महिला हातात उद्घाटनाचे साहित्य घेऊन सज्ज. आणि सकाळी 9 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अजित पवार यांचे आगमन झाले. व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
निमित्त होते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या पुणे विभागस्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी चित्रमय आणि मजकूर रुपातील हे प्रदर्शन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात यासाठी 1 ते 5 मे या कालावधीत लावण्यात आले. प्रदर्शनाविषयीचा सविस्तर वृत्तांत..
शासनाने राबविलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत विविध उपक्रमांद्वारे केले जाते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार प्रत्येक महसूल विभागात तसेच मुंबई शहर व उपनगर भागात विभागस्तरीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार उपरोक्त प्रदर्शन संपन्न झाले.
या प्रदर्शनामध्ये 58 प्रदर्शन फलक लावण्यात आले. त्यापैकी 6 फलकांद्वारे पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापर व सांगली जिल्ह्यांची माहिती प्रदर्शित करण्यात आली. एकूण फलकांद्वारे कृषी विकासाला मिळतेय बळ, मदतीसाठी सदैव तत्पर, आपत्तीशी लढण्यासाठी सदैव सज्ज, खावटी अनुदान योजना, गरीब व गरजूंना शिवभोजन केंद्राच्या माध्यमांतून शासनाचा दिलासा, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, पर्यावरणाचा समतोल, पर्यावरण रक्षण, कोरोना मुक्तीतून ग्रामविकास, उर्जामय कामगिरी व कामगारांना मदतीचा हात या योजनांची माहिती लावण्यात आली.
याबरोबरच महिला आणि बालकांचा आत्मसन्मान राज्याच्या विकासात त्यांचा पहिला मान, मत्स्यव्यवसायाला चालना, जलसंधारणातून समृध्दी, सामाजिक न्याय, वंचितांच्या हितासाठी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक, नागरी सुविधा, आदर्श शाळा, पर्यटनाच्या नव्या दिशा, पुणे शहरातील वाहतूकीतील सुसूत्रता, पुण्यात चार चक्राकार मार्ग बांधणार, समृध्दी महामार्ग, उद्योग व्यवसायाला गती, सन्मान मराठीचा, उच्चशिक्षण, शेतकर्यांच्या हितासाठीच्या योजना, फळबागांचे संवर्धन, वनसंरक्षण आणि संवर्धन, गड किल्ल्यांचे जतन व सर्ंवधन, सेवाचे बळकटीकरण आदी योजनांची सचित्र माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्कृष्टपणे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय योजना नागरिकांपर्यंत चांगल्यारीतीने पोहोचतील, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी प्रत्येक फलकाजवळ जाऊन सविस्तर माहिती घेतली.
मान्यवरांच्या भेटी
प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यामध्ये खासदार गिरीश बापट, आमदार सर्वश्री संजय जगताप, सुनिल शेळके, अशोक पवार, दिलीप मोहिते-पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे. तसेच यशदाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, माजी आमदार सर्वश्री उल्हास पवार, मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू ड. पूर्वा दिक्षित, विख्यात भारतीय नेमबाज अंजली भागवत, संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी- कर्मचारी व अभ्यागतांनी प्रदर्शनाला भेट देऊन या उपक्रमाचे स्वागत केले.
सामान्य नागरिकही व्हीआयपीच
एकाच छताखाली एवढ्या योजनांची माहिती मिळाल्यामुळे भारावून गेल्याच्या प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिल्या. तर प्रदर्शनामुळे बर्याच माहिती नसलेल्या योजनांची माहिती मिळाली असेही अनेकांनी सांगितले. प्रदर्शनाला भेट देणारे सर्वच नागरिक आमच्यासाठी अतिमहत्त्वाचेच होते. तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती अतिथी होती. प्रत्येकाचे स्वागत तितक्याच उत्साहाने टीम करत होती. नागरिक सर्व योजनांची माहिती प्रत्येक फलकाजवळ जाऊन घेत होते. काही जण फलकाजवळ सेल्फी घेत होते तर काहीजण माहिती मोबाईलमध्ये टिपली. प्रदर्शन भरवण्यामागचा उद्देश यामुळे सफल झाल्याचे दिसून आले.
काव्यमय प्रतिक्रिया
प्रदर्शन पाहून पुण्याचे चंद्रकांत शहासने यांनी आयोजकांचे कौतुक करुन काव्यमय प्रतिक्रिया दिल्या…
महाराष्ट्र व्हावा समृद्ध..
हाच दिसतसे अट्टाहास..
याकारणे प्रदर्शनाचा प्रपंच..
लोकांप्रती मांडियेला…
तर प्रदर्शन पाहून खूप छान वाटले, प्रगतीचा अभिलेख वाचून भारावून गेलो, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर खुर्पे यांनी दिली. तर उल्हास पवार यांनी संकटावर मात करत विकास योजनांवर भर देत हे सचित्र प्रदर्शन माहितीमध्ये भर घालणारे आहे, हा उपक्रम गौरवपूर्ण आहे अशी प्रतिक्रिया दिली. प्रदर्शनाची कल्पना खूपच सुंदर होती, अशी प्रतिक्रिया सौ. योगिता पंडीत स्वच्छता कामगार यांच्या 12-13 जणींच्या ग्रुपने दिली. प्रदर्शनातून विविध विभागाच्या योजनांची माहिती मिळाली असून मांडणी खूप सुंदर असल्याचे अनेकांनी सांगितले.
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षाचा काळ सर्वांसाठी अतिशय कसोटीचा होता. अशा परिस्थितीतही राज्याच्या विकासाचे चक्र गतिमान ठेवण्यात आले. या दोन वर्षाच्या कालावधीतील काही ठळक निर्णयांवर आधारित हे चित्ररुप प्रदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल. महाराष्ट्राच्या प्रगतीचे प्रदर्शन सार्यांनाच माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरेल. अशा या माहितीपूर्ण प्रदर्शनाची 5 मे रोजी सांगता झाली.
संकलन- गीतांजली अवचट
माहिती सहायक विभागीय माहिती कार्यालय,पुणे.