अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): इंदापूर शहरातील अहमद रजा सोशल फौंडेशन च्या माध्यमातून तब्बल दोनशे गरीब व गरजू मुस्लिम कुटुंबांना रमजान ईद च्या निमित्ताने शिरखुर्मा साहित्याच्या किटचे वाटप गुरुवारी (दि.28) करण्यात आले. अहमद रजा सोशल फौंडेशन च्या या स्तुत्य उपक्रमास कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा व बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ड. राहुल मखरे व इतरही दानशूर व्यक्ती भरगोस अशी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन करत असतात.
गेली दोन वर्ष कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याकारणाने उद्योग व्यवसाय ठप्प होते.त्यामुळे अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला होता.अशा बेताच्या परिस्थितीत गरीब कुटुंबांना अन्न धान्यांच्या शेकडो किटचे वाटप अहमद रजा सोशल फौंडेशन च्या वतीने आणि ड.राहुल मखरे,भरतशेठ शहा व शहरातील इतर प्रतिष्ठीतांच्या सहकार्याने करण्यात आले होते. तसेच ईदचा आनंदोत्सव इच्छा असूनही साजरा करण्यात अडचणी निर्माण झालेल्या कुटुंबांना रमजान ईद आनंदाने साजरी करता यावी, या सामाजिक जाणिवेतून दोन वर्ष मदतीचा हात देऊ केला व गरीब व गरजू मुस्लिम कुटुंबांची ईद गोड केली.
यावर्षी देखील रमजान ईदमधील वैशिष्ट्यपूर्ण शीरखुर्मा या खाद्यपदार्थासाठी लागणारे काजू, बदाम, पिस्ता, शेवया, खोबरे, साखर, खजूर,चारोळे तसेच विविध प्रकारच्या डाळी इ. साहित्याचे दोनशे कीट गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आले. अशी माहिती वसीम शेख, मोहसीन शेख व तौसिफ़ बागवान यांनी दिली.
तसेच आगामी काळात अहमद रजा सोशल फौंडेशनकडून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारी अंतर्गत प्रशस्त असे वाचनालय सुरू करणे तसेच मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अहमद रजा सोशल फौंडेशनचे अध्यक्ष वसीम शेख यांनी दिली.