दिवाळी म्हटलं की, सर्वत्र आनंदाचे वातावरण, प्रत्येक घरातून गोड-धोड करण्याचा सुगंध दर्वळत असतो. लहान मुलांची गडबड सुरू असते. कोरोना येण्यापूर्वी आपण प्रत्येक दिवाळीला म्हणत होतो दिवाळीच्या सुट्टीला तुमच्याकडे येतो. मात्र, गेल्या दीड वर्षापासून शाळांना सुट्टी आहे व काही महिने कुटुंब प्रमुखांना सुट्ट्या मिळाल्या होत्या.
यंदा दिवाळीचा फराळ महागला आहे. इंधन दरवाढ, लॉकडाऊनमुळे फराळासाठी लागणारे विविध जिन्नसांचे भाव वाढलेत. त्यातच कोरोना, लॉकडाऊनचा खाद्य पदार्थांनाही फटका बसला आहे. त्यामुळे दिवाळीचा फराळ महागला आहे. खाद्यतेलासह विविध जिन्नस महागले आहेत. खाद्यतेलासह विविध जिन्नसही महागले आहेत. खोबर्यानेही भाव खाल्ला आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे खरेदीवर मर्यादा आल्या आहेत.
महागाईचा भडका उडताना दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटर मागे 100 रुपयांच्यावर गेले आहेत. याचा फटका हा वाहतूक व्यवसायाला बसला आहे. वाहतुकीचे दर वाढल्याने खाद्य पदार्थांच्या किमतीवर याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे महागाईत अधिक भर पडली आहे. तेल, खोबरे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी आदींच्या भावात वाढ झाली आहे. खाद्यतेलाचे चढे दर आणि विविध जिन्नसांच्या किंमतीत झालेली वाढ यामुळे दिवाळीच्या फराळासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी लागणार्या सर्वच जिन्नसांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तेल, तूप, बेसन, मैदा, चणाडाळ, सुकामेवा महाग झाला आहे. फराळाचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत.
महागाईने डोकं वर काढू देत नाही अशा परिस्थितीत अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळ दरवर्षी ना-नफा, ना-तोटा तत्वावर लाडू, चिवडा इ. वस्तु विक्री करीत आलेले आहेत. यावर्षी सुद्धा ना-नफा, ना-तोटा तत्वावर दिवाळीचे पदार्थ विक्री करणार आहेत. या दिवाळी पदार्थ विक्रीचा उद्देश गोर-गरीब, गरजुंची दिवाळी सुख, समृद्धी व भरभराटीने जावो हा असतो. या वस्तुंसाठी समाजातील दानशूर व्यक्ती सढळ हाताने मदत करीत असतात आणि आपल्या कमाईतील थोडा हिस्सा अशा गोर-गरीब गरजुंवर खर्च करण्यासाठी ते पुढे येत असतात.
मात्र, वाढत्या महागाईमुळे गोर-गरीब व गरजुंसाठी उपलब्ध करून देणार्या दिवाळीच्या पदार्थांवर ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांची नजर आहे. कारण आज बाजारात 300 ते 350 रूपये किलो मोतीचूर लाडू असतील आणि तांदुळवाडी वेस तरूण मंडळ 180 रूपये किलोने देत असतील तर चांगल्या चांगल्यांच्या भुवया वर गेल्याशिवाय राहणार नाही. महागाईत कुठं स्वस्त मिळते का याची माहिती घेण्यासाठी नागरीक कान टवकारून बसलेले आहेत. या गोर-गरीब गरजुंच्या पदार्थावर आर्थिक परिस्थिती चांगल्या असणारे फायदा घेण्याच्या तयारीत आहेत. यात त्यांचाही काही दोष नाही वाढती महागाईमुळे सर्वांचेच जीने मुश्कील झाले आहे.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे कोरोना विरोधातील या लढाईत मुंबईकरांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबईत 26 मार्च 2020 नंतर म्हणजेच गेल्या 18 महिन्यांनंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे. याकडे मुंबईच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यातील एक चांगली कामगिरी म्हणून पाहिले जात आहे. सर्वत्र रूग्ण संख्या कमी आहे मात्र, गर्दीत जाण्याने किंवा विनामास्क फिरल्याने कोरोनाचे रूग्ण वाढू शकतात त्यामुळे दिवाळीत काळजी घेणे गरजेचे आहे.
महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे काम केंद्र व राज्य सरकारचे आहे. आज सर्वसामान्य नागरीकांची अवस्था पाहिल्यास हाताला काम नाही, कुटुंबाची उपजिवीका कशी भागविणार हा खरा प्रश्र्न आहे. राज्य सरकार शाळा सुरू करणार मुलांना शालेयवस्तु लागणार त्याचा खर्च, फी याचा ग्रहण प्रश्र्न पडलेला आहे. कोरोना, महागाई या सर्वांना आपण लढा देत आलेलो आहे. अजुन काही काळ लढा द्या आपल्या गरजांवर नियंत्रण ठेवा.