अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): इंदापूर तालुक्यातील मौजे लाखेवाडी येथील मागासवर्गीय कुटुंबावर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लाखेवाडी येथे मागासवर्गीय कुटुंबाच्या वतीने दि.1 ऑक्टोबर 2021 रोजी उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन इंदापूर तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की आमच्यापैकी बर्याच लोकांना शासनाने यशवंत घरकुल व इंदिरा आवास, पंतप्रधानमंत्री आवास योजना मधून घरे बांधून दिली आहेत.तसेच गट क्रमांक 506 यांचे एकुण क्षेत्र 91.24 एकर असून त्यापैकी 25 एकर क्षेत्र हे नऊ लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 एकर प्रमाणे 1976 रोजी महाराष्ट्र शासनाने वाटप केले आहे.
त्याच बरोबर इंदिरा आवास, पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधण्यासाठी आमच्यापैकी बर्याच जणांना एक गुंठा क्षेत्र हे महाराष्ट्र शासनाने वाटप केले असून गाव नमुना सातबारा पत्रिके मध्ये आमच्या नोंदिचा समावेश आहे.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, 1976 मध्ये वाटप केलेल्या नऊ खातेदारांपैकी अनेक खातेदारांनी आपल्या जमिनी या आपल्या घरगुती अडचणीमुळे व औषधोपचारासाठी विक्री केल्या असून त्याची सातबारा पत्रिकेमध्ये नोंद झाली आहे. या वाटप क्षेत्रामध्ये सहकार महर्षी साखर कारखान्याचे गट सेंटर आहे. त्याच बरोबर बाकीच्या खातेदारांच्या विक्री केलेल्या व त्यांची वहिवाट असणार्या क्षेत्रावर आमच्यापैकी काही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पक्की घरे बांधली आहेत.आम्ही कोणत्याही प्रकारे शासकीय वन जमिनीमध्ये अतिक्रमण केलेले नाही.
तरीही मौजे लाखेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथिल प्रभाकर तुकाराम खाडे तसेच संतोष प्रभाकर खाडे व प्रदीप प्रभाकर खाडे या व्यक्ती आम्हाला सर्वांना मिळून 50 लाख रुपयांची खंडणी मागत आहे व न दिल्यास मी तुमची घरे उद्ध्वस्त करून टाकेल व तुमच्या कुटुंबाला बेघर करेल अशी धमकी देत आहेत असे निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे सदर व्यक्ती कडून आमच्या सर्व कुटुंबांना जीवितास धोका असल्याने सदर व्यक्तीला तात्काळ अटक करण्यात यावी व योग्य ती कारवाई करण्यात यावी जर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व दलित कुटुंब दि.1 आक्टोंबर 2021 पासून सकाळी 10 वाजल्या पासून मौजे लाखेवाडी गट क्रमांक 506 मध्ये विठ्ठल मंदिर या ठिकाणी उपोषण व धरणे आंदोलन करत असून याची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी दलित कुटुंबांनी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.