राज्यस्तरीय सृजन भजन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा
बारामती(वार्ताहर): ऑनलाईन राज्यस्तरीय सृजन भजन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. यामध्ये कर्जत-जामखेड विभागातून हरिभाऊ काळे तर महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावतीचे गोपाळ सालोडकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
कर्जत-जामखेड विभागीय स्पर्धेत आणि महाराष्ट्र राज्यस्तरीय अशा दोन वेगवेगळ्या गटात घेण्यात आली.
कर्जत-जामखेड विभागात : द्वितीय पांडुरंग डाडर, तृतीय शिवाजी पांढरे तर महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय मुंबईचे विद्याधर तांबे, तृतीय कोकणातील रुपेश देशमुख यांनी पटकाविले आहे.
वरील स्पर्धकांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वारकरी संप्रदायमधील मान्यवरांचा देखील राजेंद्र पवार, सौ.सुनंदाताई पवार व सौ.कुंतीताई पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सृजन भजन स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील स्पर्धकांसह देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील 31 संघ सहभागी झाले होते. यामध्ये तामिळनाडूतील 26 संघ, कर्नाटकातील 3 संघ, गुजरात आणि मध्यप्रदेश येथील प्रत्येकी 1 संघाने सहभाग घेऊन आपल्या भजन संगीततून संत परंपरेतील भक्तीची अनुभूती दिली.
महाराष्ट्रात पाहिल्यांदाच राज्यस्तरीय सृजन भजन स्पर्धेसारखा उपक्रम राबविण्यात आला असून यंदा त्याचं तिसरं पर्व देखील तेवढ्याच जल्लोषात रंगलं. राज्यातील एकूण 36 जिल्ह्यातून, 197 तालुक्यांतून 1220 संघ तसेच 14512 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला असून 15 ऑगस्ट 2021 रोजी या स्पर्धेची बारामती येथे सांगता झाली.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पाडला गेला. भजन-कीर्तन सारख्या कला आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतीचा भाग आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीला आपली संस्कृती जपताना अध्यात्माची आवड जोपासता यावी तसेच या कोविड संकटकाळात विठ्ठल भक्तीची सर्वांना अनुभूती घेता यावी म्हणून आमदार रोहित पवार यांचा हा प्रामाणिक प्रयत्न होता.
सांगता समारंभात आ.पवार यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्यांमधील अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्याच्या बाबत महत्वपूर्ण घोषणा केली. अहमदनगर जिल्ह्यात वसलेला खर्डा किंवा शिवपट्टन किल्ला महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. खर्डा किल्ल्याच्या याच कातळांनी एकेकाळच्या निधड्या छातीच्या रांगड्या मावळ्यांचा पराक्रम पाहिला आहे. तेव्हा या किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचं प्रतीक म्हणून आणि उत्तम गुणांनीं संपन्न असलेला, 74 मीटरचा, जगातील सर्वात मोठा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे.
भारतातील मुख्य धार्मिक ठिकाणी आणि पंढरपूरला हा ध्वज फिरवला जाईल. शेवटी 15 ऑक्टोबर 2021 रोजी स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल. या ध्वजविषयी मत व्यक्त करताना आमदार रोहित पवार म्हणाले की हा भगवा रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे आणि या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच माऊली सावंत, श्रीधार भोसले आणि रामेश्वर डांगे सारख्या दिग्गज परीक्षकांनी उत्तम कामगिरी बजावली.