राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण : स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे व उपस्थितांना दिल्या शुभेच्छा

पुणे, दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी राष्ट्रीय ध्वजवंदन केले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार शरद रणपिसे, आमदार भीमराव तापकीर, आमदार श्रीमती माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, साखर आयुक्त शेखर गायकवाड, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम् जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे यांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

‘तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या राज्यात आलो आहे’ (आपकी परमिशन लिए बगैर आपके राज्य मे आय है…) अशी मिश्किल टिप्पणी राज्यपाल कोश्यारी यांनी केली. त्यावर अजित पवार यांनीही हसून ‘अरे ऐसा कुछ नही’ असं म्हणत राज्यपालांना प्रतिसाद दिला.

भगतसिंह कोश्यारी हे अनुभवी राजकारणी आहेत. त्यांनी उत्तराखंडचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे. देशातील राजकारणाचीही त्यांना चांगली जाण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता किती ताकदीचा आहे आणि त्यांचं कार्यक्षेत्र, प्रभावक्षेत्र कोणतं आहे, याची उत्तम माहिती कोश्यारी यांना असल्याचं आजच्या भेटीत दिसून आलं. पुणे जिल्ह्यात अजित पवारांचा दबदबा असल्याचं कोश्यारी यांना चांगलं माहीत आहे. त्याच अनुषंगानं त्यांनी ही मिश्किल टिप्पणी केल्याचं बोललं जातं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!