बारामती नगरपरिषद हद्दीतील विकास राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्यामुळे झाला हे कोणीही नाकारू शकत नाही. सर्व सोयी सुविधा, निधी सहजतेने उपलब्ध होतात त्यामुळे कोणत्याही नगरसेवकाला संघर्ष करण्याची गरज नाही. फक्त त्याने प्रभागाचा विकास कसा करता येईल. नागरीकांच्या अडचणी समजून त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे.
मात्र काही बहाद्दर नगरसेवक निवडून गेल्यापासून प्रभागात आलेच नाही. प्रभागात कित्येक सुख-दु:खाच्या घटना घडल्या तरीही यांनी डोकावून पाहिले नाही. मोबाईलच्या रिंग वाजून-वाजून तो मोबाईल त्या नगरसेवकासारखा डिस्चार्ज झाला मात्र, काही बहाद्दर नगरसेवकांनी प्रभागात डोकावून सुद्धा पाहिले नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.
बारामती नगरपरिषदेच्या पूर्व भागातील एका प्रभागातील इस्टेटमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता तळमळीने प्रभागात काम करीत आहे. लोकांची मने जाणून ती जिंकत आहे. नागरीकांच्या गळ्यातील ताईत, मसिहा म्हटलं तर वावगे ठरू नये असे कामातून लोकमान्य ठरत आहे. कोरोना व लॉकडाऊन काळात प्रभागातील नागरीकांची जी सेवा या निष्ठावंत कार्यकर्त्याने व त्याच्या सर्व सहकार्यानी केली ती वाखण्याजोगी होती. या कार्यकर्त्याने एखादा उपक्रम राबविला त्याचा प्रसार व प्रचार केला की, लगेच हा नगरसेवक लंगोट लावून मैदानात उतरत असे. या कार्यकर्त्याने एखादी जयंती घेतली, एखादे शिबीर घेतले किंवा वृक्षारोपण कार्यक्रम केला की लगेच हा लोकमान्य नसलेला नगरसेवक जसं की या प्रभागाचा मालकच मी आहे तसं किस्ताक लावून येत असे. या कार्यकर्त्याने स्वच्छता मोहिम राबविली की, लगेच नगरपरिषदेत फोन करून स्वच्छता कर्मचारी का पाठवता, कोणी सांगितले मी नगरसेवक आहे की कोण? असे म्हणून आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना सुनावत असे. या नगरसेवकाला साथ कोणाची तर कॅनॉलवर फिरणार्या मुकादमाची. मुकादम म्हणेल तशी कृती करायची पण या मुकादमाला स्वत:चा प्रभाग तरी सांभाळता आला का?
पण या नगरसेवकाला कुठं माहीत की गेली तीन-चार वर्ष आपण प्रभागात पाऊल सुद्धा ठेवले नाही, ढुंकून सुद्धा पाहिले नाही. त्यामुळे आपल्याला नागरीक मान्य करीत नाही. कोणत्या कार्यक्रमास बोलवत नाही. या नगरसेवकाला ङ्कनगरसेवकङ्ख या सहा अक्षराचा अर्थच आजपर्यंत कळालेला नाही. शेवटच्या एक दीड वर्षात सतत हा नगरसेवक प्रभागातील इस्टेटमध्ये येत आहे. माणसांनी चांगल्या कामाचे अनुकरण करावे मात्र, समोरचा चांगले काम करीत असेल तर त्याच्या कामात खोळंबा घालू नये. लोकमान्य नसलेल्या नगरसेवकाला हे पाच वर्षात कळालेच नाही. ना.अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा कार्यक्रमाचा प्रोटोकॉल असतो हे सुद्धा या लोकमान्य नगरसेवकाला कळत नसेल तर या नगरसेवकाने घरात झाडू व पाणी भरण्याचे काम करावे. अचानक उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या पी.ए.ना मी नगरसेवक आहे मी कार्यक्रम घेतला आहे माझ्या कार्यक्रमास दादा आलेच पाहिजे. पी.ए.नी या नगरसेवकाला सांगितले मात्र, नगरसेवक इतका अट्टाहास धरला की जसं की सर्व प्रभागातील नागरीक सकाळ-सकाळ याच्या कार्यक्रमास उपस्थित राहुन हाच नगरसेवक कायम आम्हाला मिळो असे नागरीक म्हणतील असं त्यास वाटत होते मात्र या नगरसेवकाने स्वत:च स्वत:ची पाठ थोपटण्याचा कार्यक्रम केला आहे.
प्रभागात गेली चार वर्ष खरीच सेवा केली असती तर आज प्रभागातील लोकांनी डोक्यात नाही तर डोक्यावर घेतले असते. पुढील पंचवार्षिक निवडणुका वॉर्डनुसार होणार आहेत. त्यामुळे ज्याने खरंच काम केले, माणुसकी जपली, अर्ध्यारात्री लोकांसाठी धावले, सुख-दु:खात आधार दिला अशा उमेदवारालाच नागरीक निवडून देणार हे दिसत आहे. मग त्या उमेदवाराने कितीही पैसा वाटू द्या, नागरीक तोच पैसा घेऊन आपल्या वॉर्डाचे प्रतिनिधीत्व करणारा निवडणार आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये कित्येक प्रभागातील काही नगरसेवकांचा अनुभव मतदारांना वाईट आलेला आहे. यापुढे मतदारांनी विचार करून उमेदवार निवडून नाही आणला तर नगरपरिषद हद्दीतील पूर्व भागातील या इस्टेटीप्रमाणे नागरीकांना वार्यावर सोडले जाईल. मग एखादा सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून कामे मार्गी लावावी लागतील याचे भान मतदारांनी ठेवले पाहिजे.