बारामती(वार्ताहर): शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य दाखविलेल्या महाविद्यालयातील गुणवान खेळाडूंचा गौरव करण्यासाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा नैपुण्य पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दि. 14 जून 2021 रोजी आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक प्रा.राजकुमार देशमुख म्हणाले की, खेळाडूंनी क्रीडांगणावर नियमित सराव करून कौशल्य प्राप्त करावे आणि खेळावर देखील तेवढेच प्रेम करून आपल्या संस्थेचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल करावे. कोरोना महामारीच्या काळात सर्वानाच शारीरिक सुदृढता जपण्यासाठी प्रत्येकाने क्रीडांगणावर जाऊन सराव केला पाहिजे तरच आपण शारिरीक सुदृढ राहू शकतो तसेच खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळाले तर 5% खेळाडू आरक्षणाचा फायदा कसा घेता येतो व खेळातून करइर करणे कसे शक्य आहे याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंबचे शारिरीक शिक्षण संचालक डॉ.सुहास भैरट हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर होते. या समारंभाचे स्वागत, प्रास्ताविक आणि पारितोषिक वाचन डॉ.गौतम जाधव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.अशोक देवकर यांनी केले.