वतन की लकीर (ऑनलाईन): मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकारने अशी भूमिका घ्यावी की पुन्हा समाजाला रस्त्यावर उतरायला लावू नये. आधीच 58 मोर्चे काढले आहेत. अजून किती वेळा लोकांना रस्त्यावर आणायचं? सध्या मराठा समाज अस्वस्थ असला तरीही करोना काळात जीव महत्त्वाचा त्यामुळे अशा वेळी आंदोलन हा पर्याय नसल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.
मराठा समाजाच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे राजेंनी सांगितले. त्याचबरोबर येत्या 27 तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या महाराष्ट्र दौर्याची सुरुवात त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
मराठा समाजाची भूमिका समजून घेण्यासाठी आपण मराठवाडा खानदेश असा महाराष्ट्र दौरा करणार आहोत आणि त्या माध्यमातून आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितलं. आंदोलन हा एक भाग आहे. पण सध्या करोनाच्या प्रादुर्भावाचा विचार करता जीव वाचणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे अशा वेळी आंदोलन हा विषयच चुकीचा आहे, त्यामुळे या प्रश्नावर अन्य मार्ग काढण्यासाठी आपण मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सर्व आमदार, खासदार, मंत्री यांना भेटणार आहे, असंही ते म्हणाले.
येत्या 27 तारखेला या सगळ्यांची भेट घेऊन त्यांना मराठा समाजाची भूमिका समजावून देणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली. आपल्याला उद्धवजींचा फोन आला आणि त्यांनी भेटायला बोलावलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड समितीचा अहवाल धुडकावून लागला. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहे. बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी शाहू महाराजांनी चळवळ सुरु केली. त्यांनी राज्याला देशाला पुरोगामी चळवळीची दिशा दिली, असंही ते म्हणाले.