सोमेश्वरनगर(वार्ताहर): डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काळात परिस्थितीला अनुसरून समाजाच्या वेदना प्रगट करण्यासाठी मूकनायक या मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरवात केली होती.आज त्यांच्या मूकनायक या नावामागचा मतितार्थ लक्षात येतो. कदाचित त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत अनेक पत्रकार हे गोरगरिब जनतेच्या वेदना समाजापुढे मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करताना दिसतात त्यामुळे पत्रकार हाच या समाजाचा खरा मूकनायक असल्याचे मत जेजुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी व्यक्त केले.
जेजुरी ( ता.पुरंदर ) येथे भारतीय पत्रकार संघाचा वर्षपूर्ती सोहळा तसेच पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रमेश वसंतराव लेंडे यांचा सत्कार समारंभ पोलीस निरीक्षक सुनीलजी महाडिक यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी पत्रकार संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष कैलास पठारे पुणे शहराध्यक्ष देविदास बिनवडे सचिव नामदेव गुट्टे बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष विनोद गोलांडे,सोमनाथ लोणकर महंमद शेख ,ए.आय.जे.पुरंदरचे अध्यक्ष सिकंदर नदाफ कार्याध्यक्ष गणेश मुळीक सचिव संभाजी महामुनी ,जेष्ठ पत्रकार गुणशेखर जाधव ,जयंत पाटील ,नारायण आगलावे दिपक धेंडे अतुल काटकर अस्लम नदाफ जेजुरी नगरपालिकेचे नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते जयदीप बारभाई माजी नगरसेवक संपत कोळेकर ,सामाजिक कार्यकर्ते यशवंत पडळकर,नाना दाते ह.भ.प.अशोक महाराज पवार अभिजित कवितके,राहुल घाडगे साहिर शेख, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी उत्तम लेंडे बेलसर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश बुधे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनील महाडिक पुढे म्हणाले की,अलीकडच्या काळात अनेक जण वृत्तपत्रांच्या किंवा पत्रकार संघाच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग किंवा इतर उद्योग करताना आढळत आहेत.त्या गोष्टींपासून सर्वांनी दूर राहिल्यास पत्रकार हा खर्या अर्थाने समाजाचा मूकनायक होईल.आणि भारतीय पत्रकार संघ त्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
या दरम्यान ए.आय.जे. पुरंदरच्या उपाध्यक्षपदी पत्रकार संदिप बनसोडे तर हल्ला कृती समितीच्या प्रमुखपदी संदिप झगडे यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सिकंदर नदाफ यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजेंद्र जावळेकर यांनी मानले.