पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचे नव्हे तर विकासाचं राजकारणाची गरज

वतन की लकीर (ऑनलाईन): विकासाचे महामेरू म्हणून पवार कुटुंबियांकडे पाहिले जाते. बारामती हे एक विकासाचं मॉडेल म्हणून सर्वत्र गणले जात आहे. ज्या पटीत मतदार पवार कुटुंबियांवर मताच्या रूपात प्रेम करतात त्याच्या कितीतरी पटीने विकासात्मक प्रेम पवार करीत आलेले आहेत. याच गोष्टीतून पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात भावनेचे नव्हे तर विकासाचं राजकारणाची गरज असल्याचे बोलू जावू लागले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले. भारत भालके हे खा.शरदचंद्रजी पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर पवार साहेबांचा प्रभाव आहे. विधानसभेच्या या रिक्त जागेवर पवार साहेब म्हणतील तीच पूर्वदिशा होणार आहे.

या मतदार संघात पार्थ पवार का भगीरथ भालके? यांना उमेदवारी देणेबाबत तर्क वितर्क चर्चेला उधान आले आहे. येथील एका गटाला पार्थ पवार उमेदवार द्यावा असे वाटत आहे तर दुसरा गट स्थानिक उमेदवार भगीरथ भालके द्यावा असे म्हणत आहेत.

पार्थ पवार यांचे मावळ लोकसभा मतदार संघात सद्यस्थितीला पाहिले असता सामाजिक कार्यातून कामाचा डोंगर उभा केलेला आहे. प्रसिद्धीच्या मागे न लागता त्यांनी एका हाताने केलेली मदत दुसर्‍या हाताला कळू देली नाही एवढं मोठं काम केले आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊन काळात पार्थ फौंडेशनच्या माध्यमातून कित्येक कामगार, विद्यार्थ्यांना प्रवासाची व भूखेलेल्यांना अन्नाची सोय त्यांनी केली तीही अखंडित सुरू ठेवली होती. नागरीकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप मोठे काम केले. हे काम त्यांनी फक्त मावळपर्यंत मर्यादित न ठेवता इतरत्र सुद्धा केले.

कर्जत-जामखेड म्हटलं की, सर्वांच्या तोंडी ड्रायभाग म्हणून गणला जात होता. पवार साहेबांनी जेव्हा त्यांचा एक नातू रोहित पवार यांना उमेदवारी देवून येथील विकास न करता सत्ता गाजविणार्‍याला आस्मान दाखविले. आज कर्जत-जामखेडचे विकासात्मक रूप बदलत चालले आहे. रोहित पवार मंत्रीमंडळात नसताना सुद्धा याठिकाणी छोट्या-छोट्या गोष्टीतून विकास केला जात आहे. एका पंचवार्षिक निवडणूकीत विकास होत नसतो. या सर्व बाजु पाहता मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी देण्याची मागणी होत आहे.

भारत भालके यांचे संसदीय कामकाज उत्तम होते व कार्यकर्ते सांभाळण्याची एक वेगळीच हातोटी त्यांच्याकडे होती ती कोणालाही जमणार नाही. भारत भालके हे सलग तिसर्‍यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाल्याने याठिकाणी राष्ट्रवादीचे मोठे जाळे आहे. भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके मध्यंतरी जिल्हा परिषद कासेगाव गटातून पराभूत झाले होते त्या गटात परिचारकांची पकड होती. तर खर्डी जिल्हा परिषद गटात परिचारकांच्या विरोधात बागल कुटुंबियांनी विजय मिळविला होता. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. साखर कारखाना म्हटलं की, कित्येक शेतकरी कुटुंबियांचा प्रपंच यावर अवलंबून असतो. त्यामुळे कारखान्यावर करडी नजर असणे गरजेचे आहे या कारखान्याचा अध्यक्षाला जर आमदारकीला उभे केले तर चुकीचे होईल असेही याठिकाणी बोलले जात आहे. कारण मध्यंतरी असाच प्रकार बारामतीच्या लगत असणार्‍या तालुक्यात घडला. चांगला सक्षम, जातीने लक्ष देणारा अध्यक्ष आमदार केल्याने संपूर्ण राज्यात एक नंबर भाव देणार्‍या कारखान्याची परिस्थिती काय झाली हे सांगण्याची गरज नाही.

सध्या मतदारसंघात गेल्या कित्येक वर्षांपासून मंगळवेढ्यात 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न, पंढरपूर एमआयडीसी इ. मागण्या प्रलंबित आहेत. त्या पूर्ण न झाल्यानं पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी व अनेक वर्षांचे प्रश्र्न सुटतील असे माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू व कर्मवीर औदुंबर पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरजित पाटील यांनी म्हटले आहे. तशी मागणी सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्याकडे केली आहे.

भारत भालके सलग तीन वेळा आमदार झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. यातील एक गट पार्थ पवार व दुसरा गट भगीरथ भालके स्थानिक उमेदवाराची मागणी करीत आहे. काहींच्या मते मतदारसंघात भावनेचे नव्हे तर विकासाचे राजकारण होण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे कर्जत-जामखेड याठिकाणी एका नातूला उमेदवारी देवून तेथील काही का होईना विकासाला चालना मिळाली. पक्षातील, स्थानिक नेत्यातील मतभेद दूर झाले व सर्वांनी एक दिलाने काम केले व करीत आहेत. त्याचप्रमाणे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केल्यास येथील विकासाला चालना मिळेल अशी सर्वसामान्य नागरीकांची आशा आहे. आजच्या परिस्थितीत आमदार कोण का असे ना, विकास महत्वाचा आहे आणि तोही कोणामुळे झाला हे अधोरेखित केले जात आहे.

त्यामुळे पार्थ पवार का भगीरथ भालके किंवा या दोघांना डावलून आणखीन तिसरा कोण? उमेदवार दिला जाणार आहे का याबाबत येथील मतदारांचे लक्ष लागून राहिलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार जो निर्णय घेतील तो येथील नागरीक मतदारांना व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मान्यच असेल असेही बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!