बारामती(वार्ताहर): रोनह उर्फ कल्या अविराज माने (19, रा.तांदुळवाडी), किरण राजेंद्र चव्हाण (वय-21, रा.वीरशैव मंगल कार्यालय, बारामती) या दोघांवर विकी विठ्ठल माळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बारामती शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं.491/2020 अन्वये भादवी कलम 394,34 अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी विकी माळवे हे वारसा कंपनीत सुपर वायझर म्हणून खाजगी नोकरीत आहेत. भारत फोर्ज कंपनीच्या पाठीमागे चौधरवस्ती याठिकाणी राहत असुन, दि.1 ऑक्टोबर 2020 रोजी रात्रौ 10.30 वा. सुमारास बारामती सातव चौक रेल्वे उड्डाण पुलाजवळ मित्रांसोबत जेवण करून घरी जात असताना दोन अनोळखी इसमाने चुकीचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून फिर्यादीच्या शर्टचे वरील खिश्यातील विवो कंपनीचा हॅन्डसेट मोबाईल बळजबरीने काढुन घेवून, मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली.
फिर्यादी यांनी सांगितलेल्या आरोपींच्या वर्णनावरून व खबर्यांकडून उपनिरीक्षक पद्मराज गंपले यांनी वरील दोन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले व गुन्ह्यातील दहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल हस्तगत केला. या आरोपींचा सखोल तपास केल्यास आणखीन चोर्या उघडकीस येण्याची शक्यता श्री.गंपले यांनी व्यक्त केली आहे. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस स्टेशनकडून तत्पर सेवा मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.