सोमेश्र्वर(वार्ताहर): भविष्यात कोरोना बाधित पत्रकारांना खाजगी रूग्णालयात बेड, 50 लाख रूपयांचा विमा व कुटुंबियांना वैद्यकीय धोरण अशा विविध मागण्या शासन स्तरावर करण्यासाठी भारतीय पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व नायब तहसिलदार धनंजय जाधव यांना 1 ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पत्रकार सुद्धा अदृश्य शत्रूशी दोन हात करून लढा देत आहे व प्रत्येक घडामोडीची बातमी प्रसिद्ध करीत आहे. प्रशासनाने घेतलेल्या वेळोवेळी भूमिका प्रसिद्ध करीत आहे. प्रशासनास सहकार्य व प्रामाणिकपणे त्यांची बाजू मांडण्याचे काम करीत आलेले आहे. अनेक ठिकाणी पत्रकार कोरोनाचे शिकार झालेले आहेत. भविष्यात बारामती तालुक्यात त्यांची हेळसांड टाळण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित येणार्या खासगी रूग्णालायात बाधित पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था व्हावी. शासनाच्यावतीने पत्रकारांचा 50 लाख रुपयांचा संरक्षण विमा उतरवण्यात यावा तसेच पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबीयांची देखील वैद्यकीय धोरण ठरवून शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत अशा मागण्या भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे, महंमद शेख, असिफ शेख, विकास कोकरे व इतर पत्रकार बांधव उपस्थित होते. निवेदन स्विकारते वेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सध्या पत्रकारांसाठी बेड राखीव असल्याचे सांगून, पुढील काळात कोणत्याही प्रकारची पत्रकारांना अडचण येणार नाही असेही सांगितले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे हे देखील याठिकाणी उपस्थित होते.