जागतिक कॉंग्रेस आपत्ती परिषदेत जयपाल पाटील यांच्या लेखाची निवड!

अलिबाग: 351 व्याख्यानाद्वारे संपूर्ण देशभरात 1 लाखाहून अधिक नागरीकांना आपत्ती व सुरक्षा विषयक प्रशिक्षण देणारे अलिबाग येथुन प्रसिद्ध होणार्‍या रायगडचा युवकचे संपादक, रायगड भूषण ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांचा आपत्ती व सुरक्षा विषयक कार्य करणारा लेख पाचव्या जागतिक कॉंग्रेस आपत्ती परिषदेत मंजूर करण्यात आला असल्याचे परिषदेचे संयोजन डॉ.आनंद बाबू यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

पाचव्या जागतिक कॉंग्रेस आपत्ती परिषदेचे आयोजन, एमआयटी, दिल्ली येथे 9 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2020 ला करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये कोवीड-19 नंतर जनतेने काय केले पाहिजे या विषयावर जगातील आपत्ती व सुरक्षा विषयक कार्य करणार्‍यांकडून लेख मागविण्यात आले होते. त्यामध्ये रायगड भूषण व आपत्ती व सुरक्षा तज्ञ जयपाल पाटील यांचा 138 क्रमांकाचा लेख मंजूर करण्यात आला असल्याचे पत्र संयोजकांनी पाठविले आहे. तो लेख विस्तृत करुन पाठवावा असे पत्रात म्हटले आहे.

जयपाल पाटील यांनी आकाशवाणी मुंबई, सोलापूर, रत्नागिरीवर व्याखाने दिली व रायगड जिल्ह्यामध्ये 50 हजार नागरीकांना हे प्रशिक्षण दिल्यानेच त्यांना रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 ला चौथ्या जागतिक परिषदेत आयटी मुंबई येथे ते सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी दोन चाकी मोटरसायकल अपघात वरील लेख लिहिला होता.

रायगड जिल्हा प्रतिसाद दल सदस्य म्हणून रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी त्यांची निवड केली आहे. त्यावेळच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व आताच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या 97 हजार विद्यार्थी व 6 हजार 200 शिक्षकांना हे महत्वाचे प्रशिक्षण देण्यासाठी मंजूरी दिली आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमास माजी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी 50 हजार रुपयांचे अनुदान रायगडचा युवक फाउंडेशनला मंजूर केले असून हा कार्यक्रम जिल्हाधिकारी रायगड आपत्ती प्रतिसाद दलाच्या तर्फे करावा असे सांगितले आहे. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा पहिला प्रकल्प केला जाणार आहे. या निवडीबद्दल जयपाल पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!