बनावट सह्या करून बांधकाम व्यावसायिकांची फसवणूक केल्याप्रकरणी, नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नी संगीता नाझीरकर यांना अटक!

पुणे: ओमसाई डेव्हलपर्स या भागीदारी फर्ममध्ये मुळ भागीदारांच्या बनावट सह्या करुन बांधकाम व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नी संगीता हनुमंत नाझीरकर (वय 45, रा.स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरुड) यांच्यासह 9 जणांविरूद्ध सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. 03/10/2020पर्यंत पोलिस कोठडी.

                धायरी येथील या प्रकरणात संगीता हनुमंत नाझीरकर यांच्यासह चंद्रकांत गरड, दिलीप कास्टिया, रवींद्र जैन, समीर जैन, देवेश जैन, राजेंद्र ओसवाल, रुषभ ओसवाल (सर्व रा. मार्केटयार्ड) ऍड. सय्यद इनामदार (रा़ वानवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

                मूळ भागीदाराचे आर्थिक नुकसान व इतर भागीदारांचा फायदा केल्या प्रकरणी संग्राम तानाजी सोरटे (वय 44, रा. बारामती) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

                याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम सोरटे व मधुकर विठोबा भरणे यांनी 2013 मध्ये ओम साई डेव्हलपर्स ही भागीदारी फर्म सुरु केली होती. काही काळाने त्यांचे नातेवाईक हनुमंत नाझीरकर व संगिता नाझीरकर यांनी चंद्रकांत निवृत्ती गरड (रा.हडपसर) हे त्यांच्या फर्ममध्ये सहभागी होऊ इच्छित असल्याचे सांगितले. त्यानुसार संगीता नाझीरकर यांचा भागीदारी हिस्सा 50 टक्के, गरड यांचा 20टक्के आणि सोरटे व भरणे यांचा 15 टक्के भागीदारी हिस्सा निश्चित करण्यात आला. त्यांच्या फर्मने धायरी येथे एक जागा विकसनाकरीता घेतली. त्या ठिकाणी सोरटे हे मे  2019 मध्ये गेले असताना त्यांना दुसरीच लोक दिसून आली. चौकशी केल्यावर त्यांनी आम्ही या फर्मचे 80 टक्के भागीदार असून त्यासाठी आम्ही नाझीरकर यांना 8 कोटी  23 लाख 61 हजार 420 रुपये दिल्याचे सांगितले़, तशी कागदपत्रे त्यांनी सोरटे यांना दाखविली़ त्यात सोरटे आणि इतर तिघांना प्रत्येकी 5 टक्के हिस्सा दाखविण्यात आला होता़ नाझीरकर व गरड यांनी सोरटे व भरणे यांना धायरी येथील प्रकल्पामध्ये आर्थिक नुकसान व्हावे व त्यांचा इतर भागीदार यांना फायदा व्हावा, या उद्देशाने आपल्या संमतीशिवाय खोट्या सह्या करुन, फर्ममधील 15 टक्के असलेला हिस्सा हा परस्पर  5 टक्के करुन आर्थिक फसवणुक करण्यासाठी बनावट भागीदारी पत्र व समझोता करारनामा असे खोटे दस्तऐवज तयार केला. तसेच त्यावर सोरटे यांची बनावट सही करुन नोटरी सय्यद इनामदार यांनी हा खोटा दस्ताऐवज आपण समक्ष हजर नसताना नोंदवून घेतला व तो बनावट दस्त खरा म्हणून वापरला व फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 420,465, 467, 471,409,468 आणि 34 अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सतीश उमरे अधिक तपास करीत आहेत.

                राज्याच्या नगर रचना विभागातील नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जून 2020 मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यात हनुमंत नाझीरकर यांच्यासह त्यांची पत्नी संगीता, मुलगी गीतांजली आणि मुलगा भास्कर नाझीरकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाझीरकर यांनी राज्यात अनेक ठिकाणी बेनामी संपत्ती खरेदी केल्याचा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला संशय असून त्याची तपासणी करण्यासाठी त्यांनी आयकर विभागाला पत्र पाठविले आहे. आयकर विभागाकडून त्याची चौकशी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!