बारामती(प्रतिनिधी): आरे..ऽऽ…प्रभागातील मुलभूत प्रश्न कोणासमोर मांडू…नगरसेवक भेटतच नाही हो…ते पुणे, मुंबईला असतात असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपण्यापेक्षा हक्काचा जिवाभावाचा माणूस 24×7 भेटणारा नगरसेवक मतदारांनी नगरपरिषदेत पाठवावा आणि पाच वर्षे निश्चिंत रहा असे प्रभाग क्र.20 मध्ये मतदारांमध्ये गल्ली बोळात, चौका-चौकात कुजबूज सुरू आहे.
…बे नको…दे नको..पाहिजे….ले असेही मतदार बोलताना दिसत आहेत. निवडून आलेनंतर म्हणतील आ‘बे’ काय बोलतोय मी नव्हतो इथं…तू मलाच ‘दे’ असेही काही म्हणतील त्यामुळे पाच वर्षे हाकेला धावणारा, सतत नजरेस पडणारा हक्काचा, जिवाभावाचा माणूस, मेरेसे प्रभाग में कुछ भी काम करके….‘ले’ असा म्हणणारा नगरसेवक या प्रभागात पाहिजे असेही चौका-चौकात चर्चेचा विषय बनलेला आहे.
प्रभाग क्र.20 हा इतर प्रभागांपेक्षा मोठा प्रभाग म्हणून समजला जातो. इतर प्रभागात दोन नगरसेवक मतदारांना निवडायचे आहेत. मात्र, प्रभाग क्र.20 मध्ये एकुण तीन नगरसेवक निवडायचे होते. यामध्ये प्रभाग क्र.20ब मध्ये महिला बिनविरोध झाल्याने खरी चुरस प्रभाग क्र.20अ आणि क मध्ये होणार आहे.
प्रभाग क्र.20अ मध्ये पाहिले असता, एकुण 7 उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये एक उमेदवार मतदारांनी निवडायचा आहे. सदरचा उमेदवार निवडताना मतदारांमध्ये द्विधा परिस्थिती निर्माण होणार आहे. प्रभाग क्र.20क मध्ये तीनच उमेदवार रिंगणात आहे. या प्रभागात अपक्ष उमेदवार सरस ठरणार का? हे पाहणे गरजेचे आहे.
प्रभागात ज्या मुलभूत गरजा आहेत त्या पूर्ण झाल्यास नागरिकांमध्ये नगरसेवकाबाबत समाधान व्यक्त केले जाते. पण तो नगरसेवक हाकेला धावणारा, समोरच्यावर प्रभाव पडणारा असावा. अन्यथा साचलेला कचऱ्याचा ढीग नगरपरिषदेत सांगून सुद्धा महिना…महिना उचलायला जाणार नसेल तर हा नगरसेवक काय कामाचा असेही बोलले जात आहे. काम करून घेण्याचे कौशल्य त्याच्या अंगी असणे गरजेचे आहे. तो ऐकून घेणारा असावा ऐकवणारा नसावा.
त्यामुळे 2 डिसेंबरला मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात हे पाहणे गरजेचे आहे. मत देताना ते वरील गोष्टींचा विचार नक्की करतील असे वाटत आहे. तरी मतदार राजा आहे, त्याची भिकाऱ्यासारखी काही लोकांनी अवस्था करून ठेवलेली आहे. त्याला पाच वर्षे राजा म्हणून ठेवणाऱ्या उमेदवाराला मतदार नक्कीच निवडून देतील यात शंका नाही. त्यामुळे …बे नको…दे नको..पाहिजे….ले असेही मतदार बोलताना दिसत आहेत.