पुणे(प्रतिनिधी): हडपसर विधानसभेच्या शिवसेना संघटिका, शिवसेनेच्या रणरागिणी सौ.प्रज्ञा अबनावे यांनी गतिरोधक होण्यासाठी पुणे महानगरपालिकेला केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, महानगरपालिकेने शेवटी गतिरोधक बसवून कित्येकांचा जीव वाचविला आहे.
याबाबत माहिती अशीकी, रेणुका माता मंदिर आणि मांजरी रोड या परिसरात वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणात सतत वाढ होत होती. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी या परिसरात गतिरोधक असणे गरजेचे होते.
सौ.अबनावे यांनी या संदर्भात विशेष प्रयत्न करून महानगरपालिकेकडून हे काम पूर्ण करून घेतले आहे. स्पीड ब्रेकर उभारल्याने यापुढे वाहनचालकांना आता कमी वेगाने गाडी हाकावी लागणार आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल. रस्त्याने वृद्ध, महिला, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असे. स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका व सौ.प्रज्ञा अबनावे आणि या कामात सहभागी असलेल्या अधिकार्यांचे स्वागत केले आहे.
सदरचा गतिरोधक होणेकामी महानगरपालिकेचे मयूर जाधव, श्री.येळे तसेच वाहतूक विभागाचे श्री.पिंगळे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. महानगरपालिकेने गतिरोधक उभारून स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिल्याने सौ.अबनावे यांनी आभार मानले. अपघात कमी करण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असेही आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
रस्त्यावर ज्याठिकाणी गतिरोधक उभारले आहेत हे सांगणारे फलक लावणे आवश्यक आहे. अन्यथा गतिरोधक समोर आल्यानंतरच गतिरोधक असल्याचे वाहनचालकांना दिसते. त्यामुळे वाहन चालकाला वेगावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही आणि अपघात होत राहतील असेही प्रज्ञा अबनावे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.