माळेगाव माधील विकासकामे चांगल्या दर्जाची करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती(उमाका): माळेगाव नगरपंचायत झाल्यानंतर या ठिकाणी विविध विकास कामे सुरू करण्यात आली असू ती चांगल्या दर्जाची करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

माळेगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात जि.प.निधीतून मंजूर झालेल्या कचराकुंडी, भजनी मंडळास भजन साहित्य व जि. प. शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी स्मिता काळे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, प्रमोद काकडे, रोहिणी तावरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, माळेगाव येथे बारामती तालुका क्रीडा संकुल उभे राहत आहे. पोलीस कार्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. सर्व विकासकामे दर्जेदार करण्यात यावीत. गावात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावावी. बारामती नीरा रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण करू नये असेही ते म्हणाले.
अनंत फ्लॉवर गार्डनचे लोकार्पण

माऊली नगर बारामती येथे अनंत फ्लॉवर गार्डनचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पौर्णिमा तावरे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, जय पाटील, माऊली नगरचे नागरिक आदी उपस्थित होते.

नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. शहराचे सौंदर्य हे हिरवळीवर ठरत असते म्हणून झाडे लावावीत आणि त्यांचे संवर्धन करावे. पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!