वर्षभर इथेनॉलचे उत्पादनासाठी आसवनी प्रकल्पांचे मल्टिफीडमध्ये रूपांतर गरजेचे -हर्षवर्धन पाटील

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): आगामी काळात इथेनॉलचे उत्पादन हे धान्याचा वापर करून वर्षभर घेता येणार आहे, त्याचा आर्थिक फायदा कारखान्यांना होणार आहे. त्यासाठी साखर कारखान्यांनी सध्याच्या आसवनी प्रकल्पांचे मल्टिफीड मध्ये रूपांतर केल्यास वर्षभर इथेनॉलचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे शुक्रवारी (दि.17) केले.

पुणे येथील साखर संकुलमध्ये देशातील इथेनॉल उत्पादन वाढीसाठी कोणती पाऊले उचलावीत यावर विचार करणेसाठी देशभरातील सहकार क्षेत्रात काम करणारे अधिकारी व तज्ज्ञांची बैठक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीस राज्याचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे उपसचिव सुरेशकुमार नायक, केंद्रीय सहकारिता मंत्रालयाचे संचालक डी. के. वर्मा, एन.सी.डी.सी.चे संचालक गिरीराज अग्निहोत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, देशभरातील सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, राज्य साखर संघांचे व्यवस्थापकीय संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इथेनॉल उत्पादनास गती यावी यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली, केंद्रीय सहकार मंत्रालय, अन्न मंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्रालय हे संयुक्तपणे कार्यरत आहेत. देशातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुमारे मार्च-एप्रिल पर्यंत चालतात. मात्र त्यानंतर इथेनॉलचे उत्पादन चालू ठेवायचे असेल तर ते धान्यावर चालवावे लागणार आहे. मका हे कमी पाण्यात व वर्षातील सर्व तिन्ही हंगामात येणारे पीक आहे. सहकार क्षेत्राला आर्थिकदृष्ट्‌या बळकट करण्यासाठी केंद्रीय सहकारिता मंत्रालयाने आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करण्याचा आणि त्याद्वारे अन्न-धान्य विशेषत मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन घेतल्यास इथेनॉल प्रकल्प वर्षभर चालतील आणि त्यातून कारखान्यांना आर्थिक स्थर्य प्राप्त होण्यास मदत मिळेल,असे त्यांनी सांगितले.

देशातील ऑइल कंपन्या याबाबत साखर कारखान्यांशी दीर्घ मुदतीचे करार करण्याबाबत अनुकूल आहेत. तसेच उत्पादित इथेनॉलची खरेदी सहकारी आसवनींकडून प्रथम प्राधान्याने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!