नुकताच बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीचा निकाल लागला आणि सौ.सुनेत्रा पवार 1 लाख 53 हजाराने पराभूत झाल्या आणि बघता..बघता बारामती शहरात स्मशान शांतता पसरली. विरोधकांचा ढोल, ताशांचा गजर व गुलाल उडवीत घोषणाने चौक दणाणून गेला होता. ना.अजित पवार यांच्याकडे सर्व यंत्रणा, कार्यकर्ते-पदाधिकार्यांचा फौजफाटा असताना एवढं मताधिक्य सुप्रिया सुळेंना कसे मिळाले हा गोंधळात टाकणारा प्रश्र्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी व विशेषत: हितचिंतकांना पडलेला आहे.
अशा निराशेच्या वातावरणात अचानक आशेचा किरण दिसून आला. महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून सौ.सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्यसभेत अर्ज दाखल केला आणि कोणाचाही विरोधात अर्ज न आल्याने सौ.सुनेत्रा पवार बिनविरोध राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्या. सदरची वार्ता वाडीपासुन देशपातळीवर पोहचताच सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला.
ज्यांनी एकनिष्ठेने कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता निवडणूकीत काम केले त्यांच्या अंगावर गुलाल मखमली कुडत्याप्रमाणे गुलाल शोभत होता. त्यांचा आनंद गगनभरारी घेत होता. या निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी विकासपुरूष ना.अजित पवार यांच्याकडे पाहुन तन-मनाने पक्षाचे काम केले. रात्रीचा दिवस करून प्रचार केला. शेवटच्या स्तरापर्यंत प्रचार केला, विरोधकांच्या तोंडाला तोंड देत मुलाखती दिल्या. वेळ पडल्यास बाह्या सुद्धा वर कराव्या लागल्या, मिश्या पिळाव्या लागल्या, दंड, मांडी थोपटावी लागली.
आता खरं या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रश्र्न पडला आहे की, ज्यांना विश्र्वासाने दादांनी मोठ-मोठी पदे दिली. चार चौघात यांची प्रतिमा वाढवली यांना दादा जवळ करणार की, दूर ठेवणार! काही पदाधिकार्यांना तर दोन-दोन पदे असताना, दादांच्या मागे-पुढे, गाडीत बसण्याची घाई करणार्यांचा बुथवर मतदान पाहिले असता, जास्तीचे मतदार खा.सुप्रिया सुळेंना झालेले आहे. म्हणजे या पदाधिकार्यांना घरात किंमत नाही म्हणून प्रभाग व वार्डात नाही आणि या दोन्हीकडे किंमत नाही त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात विशेषत: दादांजवळ किंमत त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते यांना किंमत देतात.
अशा पदाधिकार्यांची पदे काढून घेतली पाहिजे. शहरातून जर एवढं मताधिक्य खा.सुप्रिया सुळेंना मिळत असेल तर या लोकांनी कोणाचा विश्र्वासघात केला याचे आत्मपरिक्षण करण्यात गरज आहे. काही निष्ठावंत कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे तरी सुद्धा पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उभारून नागरीकांची सेवा करतात, पक्षाच्या नेत्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहचवतात. जे पदाधिकारी निस्वार्थी, दोन पैसे कसे खिश्यात येतील याचा विचार करणारे फक्त कार्यकर्त्यांना आदेश देण्याचे काम करतात आणि नेत्याला याच कार्यकर्त्यांबाबत एकाचे दोन सांगून कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करतात त्यामुळे अशा पदाधिकार्यांना जागा दाखविण्याची गरज आहे.
ज्यांच्या अंगाला गुलाल लागला त्या कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने काम केले. वेळ, काळ न पाहता पायात भिंगरी बांधल्याप्रमाणे काम केले. ज्यादिवशी निकाला विरोधात गेला त्यावेळी या निष्ठावंतांचा एवढा कंठ दाटून आला होता की, घरातील कोणता कोपरा धरून रडू किंवा काय करू असे मन विचलीत झाले होते. पण ज्या स्वार्थी पदाधिकार्याला काही देणं घेणं नाही तो मात्र दुसर्या दिवशी त्याच तोरात फिरताना दिसत होता.
त्यामुळे येणार्या प्रत्येक निवडणूकीत कोणावर विश्र्वास ठेवायचा हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याने जाणले पाहिजे. अन्यथा लोकसभेसारखेच धडे विधानसभेला गिरवले गेले तर अवघड होईल. कोणाला जवळ व कोणाला लांब ठेवायचे हे जाणले पाहिजे.