बारामती(वार्ताहर): बारामतीत 14 दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करण्यात आला त्या पार्श्र्वभूमीवर या जनता कर्फ्युला सात दिवस पूर्ण झालेने व्यापारी महासंघ व प्रशासनामध्ये आज बैठक होऊन 20 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यु कायम करण्यात आला असुन, 20 तारखेला पुन्हा बैठक घेऊन पुन्हा नियोजन करणार असल्याचे सर्वानुमते यावेळी ठरले.
यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अति.पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, तहसिलदार विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, पं.समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, माजी नगराध्यक्ष जवाहरशेठ वाघोलीकर, सुनिल पोटे, रमणिक मोता, स्वप्निल मुथा, प्रविण आहुजा इ. व्यापारी उपस्थित होते.
यावेळी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले की, राज्यभर माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पुढील सात दिवसात म्हणजे 17,18 व 19 या तीन दिवसात संपूर्ण बारामती तालुका व शहरातील प्रत्येक नागरीकांची तपासणी करून, संशयित रूग्णांवर योग्य तो उपचार करण्यात येणार आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार बारामती शहरात साडे सहाशे कर्मचार्यांच्या माध्यमातून सात ठिकाणाहून तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बारामती तालुक्यात प्रतिबंध क्षेत्रापासुन तपासणीचे काम सुरू करणार आहे. त्यामुळे नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. व्यापार्यांनी जे जनता कर्फ्युला सहकार्य केले त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने दादासाहेब कांबळे यांनी व्यापार्यांचे आभार व्यक्त केले.
नरेंद्र गुजराथी यांनी बोलताना सांगितले की, व्यापार्यांपेक्षा सर्वसामान्य हातावरचे पोट असणार्यांची काळजी जास्त वाटत आहे. कित्येकांच्या हाताला काम नाही त्यांचे फोनवर फोन येत असतात त्यामुळे सर्वबाबींचा विचार करून पुढील निर्णय घ्यावा. आमचा जनता कर्फ्युला विरोध नाही असेही ते म्हणाले.
यावेळी किरणराज यादव, राहुल काळभोर, मिलिंद मोहिते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावांमधील दक्षता समित्या व स्वयंसेवी संस्थांनी मिळून प्रभावीपणे राबवूया, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
प्रत्येकी पथविक्रेत्यांना मिळणार आत्मनिर्भर निधी :
सदर योजना 100 टक्के केंद्र पुरस्कृत असून, गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाद्वारे संचलित असलेल्या योजनेत दि.24 मार्च 2020 रोजी व त्यापुर्वी बारामती शहरामध्ये पथविक्री करीत असलेल्या नगरपरिषदेने प्रदान केलेले विक्री प्रमाणपपत्र जर प्रमाणपत्र नसेल तर नगरपरिषदेने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेले पथविक्रेते यांना रूपये 10 हजार पर्यंतचे खेळते भांडवली कर्ज उपलब्ध होणार आहे. यासाठी नगरपरिषदेत नगर पथ विक्रेता समिती करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष मुख्याधिकारी आहेत. यामध्ये 50 टक्के सदस्य हे स्थानिक प्राधिकरण (अध्यक्षासहीत), पोलीस, पथविक्रेता संघटना, व्यापारी संघटना इत्यादींचे प्रतिनिधी, 40 टक्के सदस्य हे पथविक्रेत्यांचे प्रतिनिधी, 10 टक्के सदस्य हे नामांकन केलेले स्वयंसेवी संस्था/समुदाय आधारीत संघटनांचे प्रतिनिधी असतील.