कुर्डूवाडी(प्रतिनिधी): येथील पोलीसांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी रात्रीचा दिवस करून मदत करणा-या दादा कांगरू शिंदे यांचा काही पोलीस कर्मचारी, वनअधिकारी व गावातील काही लोकांच्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आजतगायत मात्र याबाबत पोलीसांनी तक्रारी देवूनही जाबजबाब, खबर घेउनही दादाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधितांवर अनुसुचीत जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे मयत दादा शिंदेची बहिण सौ.बयती काळे (रा.लउळ, ता.माढा, जि.सोलापूर) यांनी दि.5 जून 2024 रोजी कुर्डूवाडी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत दादा हा कुर्डूवाडी पोलीस मित्र म्हणून काम करीत होता. गुन्हे व गुन्हेगार मिळणेकामी मयत दादा करीत असलेल्या कामामुळे काही मंडळींनी दादावर रोष व्यक्त करीत बदला घेण्याच्या उद्देशाने दादावर चोरीचा खोटा आरोप करण्यात आला. समोरच्या व्यक्तींनी जास्तीचा जोर लावल्याने पोलीस प्रशासनाने दादाला त्रास देण्याचे काम सुरू केले. या त्रास व खोटया आरोपामुळे दादाचे मानसिक खच्चीकरण झाले. शारीरिक त्रास होउ लागला. या मानसिक व शारीरिक त्रासाने दादाला ह्रदयविकाराचा झटका येउन मृत्यू झाला.

तत्पूर्वी, गट नं.724 मध्ये पूर्वीपासून घराचे शासकीय गायरान जमिनीत अतिक्रमण होते. सदरची जागा मिळणेकामी विविध स्तरावर पत्रव्यवहार सुध्दा करण्यात आला होता. याबाबत वन समिती सुध्दा स्थापन झालेली असताना याचा विचार न करता लष्करी बळाचा वापर करीत वनविभागीय अधिकारी सातपुते मॅडम यांनी राहते घराची तोडफोड, जाळपोळ करून होत्याचे नव्हते करून येथील साहित्य घेउन जावून खूप मोठे नुकसान केले. संबंधित कार्यालयाने सुध्दा सातबारा सदरी नोंद धरण्याचे साधा आदेश सुध्दा प्रारीत केला नाही. या सर्व गोष्टीचा मयत दादाला मानसिक व शारीरिक त्रास दिला व त्याचा मृत्यू झाला. दादाच्या कुटुंबाची कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. पुढील जीवन व्यथित करण्याचे कोणतेही साधन राहिलेले नाही. त्यामुळे या सर्व घटनांच्या त्रासामुळे व मानसिक, शारीरिक त्रासाची 20 लाख रूपयाची आर्थिक नुकसान भरपार्इ मिळावी अशीही मागणी मयताची बहिणीने तक्रारी अर्जात नमूद केली आहे.तसेच दादाच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह व उपजीवीका करण्यासाठी सदर क्षेत्राच्या सातबारा सदरी नोंद घेण्याबाबतही विनंती सुध्दा करण्यात आली आहे.
दादा शिंदे यास मानसिक व शारीरिक त्रास देण्यामध्ये पोलीस बीट अंमलदार श्री.दाडे, महिला पोलीस व तीन कर्मचा-यांनी पोलीस मित्राचे काम करीत असताना सुध्दा संगनमत करून मानसिक त्रास दिला. पोलीसांना वेळोवेळी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी दिलेल्या माहितीमुळे गावातील अभिमान जाधव, कैलास जाधव यांनी खोटया स्वरूपाचे चोरीचे गुन्हे दाखल करून जाणूनबुजून मानसिक त्रास दिला.
इमाने इतबारे पोलीस मित्र म्हणून काम करूनही पोलीस प्रशासनाकडून खोटे आरोप गुन्हे दाखल झाल्याने दादाने पोलीसांना मदत करण्याचे थांबविले. दादा वयोवृध्द असताना वैद्यकीय मदत थांबवून पोलीस हवालदार श्री.दाडे व इतर कर्मचा-यांनी त्रास दिला. जातीवाद करीत धमकी दिली हे पाहुन वरील जाधव गावातील लोकांनी सुध्दा जातीवाद केला याबाबत पोलीस स्टेशन येथे तसा जबाब नोंदविण्यात आलेला आहे असेही तक्रारी अर्जात नमूद केले आहे.
वन हक्क समिती स्थापन आहे. शासन निर्णयाप्रमाणे वन हक्क दाव्याचे पुरावे देखील सादर केलेले आहेत. एवढे सर्व असताना गट नं. 724 च्या सातबारा उता-यावर नोंद घेणे आवश्यक असताना त्यामागणीला फाटयाने मारीत दादाला जो त्रास दिला या ताणतणावामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
मयत दादा कांगरू शिंदे यांचा काही पोलीस कर्मचारी, वनअधिकारी व गावातील काही लोकांच्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मयत दादाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लोकांवर गुन्हा कधी दाखल होणार या आशेवर दादाचे कुटुंब अवलंबून बसले आहे. गृहविभाग, मंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस विभाग, सामाजिक संस्था, संघटना, आदिवासी विभाग व फाऊंडेशन या सर्वानी जातीने लक्ष घालून शिंदे कुटुंबियाला न्याय मिळवून आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
पोलीसांना गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये मदत करणा-या दादा शिंदे सारख्या पोलीस मित्रावर खोटे गुन्हे दाखल करून संगनमताने मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असेल व त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असतील तर यापुढे पोलीसांना कोणीही मदत करण्यास पुढे येणार नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांनी संबंधित शासनाच्या कर्मचा-यांची व गावातील काही लोकांची सखोल चौकशी केल्यास दादा शिंदे व त्याच्या कुटुंबास न्याय मिळेल.
तरी वरिष्ठ अधिका-यांनी याबाबत तातडीने दखल घेउन दादा शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणा-या पोलीस अधिकारी, वन अधिकारी व गावातील काही लोकांवर गुन्हा दाखल करावा अन्यथा शिंदे कुटुंबियांना न्याय मागण्यासाठी योग्य त्या ठिकाणी सविनय मार्गाने आंदोलन, उपोषण करावे लागेल याची दखल घ्यावी असेही सौ. बयती काळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.